Join us

राज्यात गेल्यावर्षी रस्ते अपघातामध्ये ११,४५२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:08 AM

नाशिकमध्ये सर्वाधिक ८०१ बळी : सिंधुदुर्गात सर्वात कमी ५१ जणांनी गमावला जीवलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील ...

नाशिकमध्ये सर्वाधिक ८०१ बळी : सिंधुदुर्गात सर्वात कमी ५१ जणांनी गमावला जीव

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या वाहनांबरोबरच रस्ते अपघातांच्या घटनाही वाढल्या आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत २५ हजार ४५६ अपघात झाले असून, या अपघातात ११,४५२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

राज्यात २०१९मध्ये १२ हजार ७८८ तर २०१८मध्ये १२ हजार ४९८ अपघाती मृत्यू झाले होते. लॉकडाऊन काळात तीन महिने रस्ते वाहतूक बंद होती. त्यामुळे अपघातांच्या संख्येत जास्त घट होणे अपेक्षित होते. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत २०२०मध्ये अपघाती मृत्यूंमध्ये केवळ १० टक्केच घट झाली आहे. सर्वाधिक अपघाती मृत्यू नाशिक जिल्ह्यात झाले. जिल्ह्यातील १,२३९ अपघातांमध्ये ८०१ जणांचा मृत्यू झाला, तर ८२० जण जखमी झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघातात मरण पावणाऱ्यांची संख्या सर्वात कमी आहे. येथे १४७ अपघातांमध्ये ५१ जणांचा मृत्यू तर १७६ जण जखमी झाले आहेत.

* मुंबईत २९९ मृत्यू, १,७३६ जखमी

मुंबईत २०२०मध्ये १,७७६ अपघात झाले. त्यात २९९ जणांचा मृत्यू झाला, तर १,७३६ जण जखमी झाले. २०१९ मध्ये २,८७२ अपघातात ४४७ जणांचा मृत्यू तर २,९२५ जण जखमी झाले होते.

* लाॅकडाऊनमुळे हाेते वाहतुकीवर निर्बंध

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात वाहतुकीवर निर्बंध होते. रस्त्यांवर वाहनांची संख्या खूप कमी होती. त्यामुळे अपघातांमध्ये घट झाली. परंतु, अनलॉकनंतर वाहनांचे रस्त्यावर येण्याचे प्रमाण वाढले तसे अपघातही वाढले.

- सुनीता साळुंखे-ठाकरे

महामार्ग पोलीस अधीक्षक

-------------------