मुंबई - पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केली आहे. रविवारी सकाळी ईडीचे १० अधिकारी राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री निवासस्थानी पोहचले. यावेळी CISF जवानही सुरक्षेसाठी तैनात होते. सकाळी ७ वाजल्यापासून राऊत यांच्या घरी ईडीचे अधिकारी चौकशी करत होते. त्यानंतर दुपारी राऊतांना ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणलं गेले. मध्यरात्री १२.४० वाजता संजय राऊतांना ईडीने अटक केली.
जवळपास ९ तास संजय राऊत यांच्या घरी सर्च ऑपरेशन सुरू होते. त्यावेळी राऊतांच्या घरात ११.५ लाख रुपये जप्त करण्यात आले. राऊतांना ताब्यात घेतल्यानंतर ६ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांना PMLA कायद्यातंर्गत अटक झाली. संजय राऊत तपासात सहकार्य करत नाही असा आरोप ईडीचे अधिकारी करत आहेत. राऊतांच्या घरी ११.५ लाख रोकड सापडली. त्याबद्दल ईडीने प्रश्न विचारले होते.
मात्र संजय राऊत यांचे बंधु आमदार सुनील राऊत यांनी दावा केला आहे की, हे प्रकरण बनावट आहे. ईडीजवळ संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याशी संबंध असल्याचे कुठलेही पुरावे नाहीत. ईडीला जो पैसा सापडला आहे तो शिवसैनिकांच्या अयोध्या दौऱ्यासाठीचा आहे. त्या पैशांवर एकनाथ शिंदे अयोध्या टूर असंही लिहिण्यात आले होते. संजय राऊत यांना विशेष कोर्टात हजर केले जाईल. राऊत यांच्या कोठडीची मागणी ईडीचे अधिकारी करणार आहेत. ईडीने रविवारी राऊतांच्या घरी छापेमारी केली. यावेळी त्यांच्या घरातून ११.५ लाख रोकड जप्त करण्यात आली. ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, ईडी शिवसेना आणि महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बँकेत संजय राऊतांच्या नावे बऱ्याच एफडी आहेत. शिवाय मुंबईसह अलिबागमध्येही त्यांच्या आणि पत्नीच्या नावे भूखंड, फ्लॅट असल्याची नोंद आहे. संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी नामनिर्देशन अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रावर आपली मालमत्ता, संपत्ती जाहीर केली होती. तेव्हा आपल्याकडे १ लाख ५५ हजार ७७२ रुपये रोकड असल्याचे संजय राऊत यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलेय. बँक खात्यात १ कोटी ९३ लाख ५५ हजार ८०९ रुपये असल्याचे राऊतांनी सांगितले होते.
प्रतिज्ञापत्रानुसार, संजय राऊत यांच्याकडे ३ कोटी ३८ लाख ७७ हजार ६६६ रूपयांच्या ठेवी आहेत. २०२०-२१ या वर्षांत २७ लाख ९९ हजार १६९ रूपये कमावले. संजय राऊत यांच्याकडे अलिबागमध्ये जमिनीचे तीन तुकडे त्यांच्या नावावर आहेत. तर त्यांच्या पत्नीच्या नावे पालघरमध्ये ०.७३ एकरची जाग आहे. ही जागा २०१४ मध्ये खरेदी करण्यात आली आहे. सध्या या जागेची किंमत ९ लाख रूपये आहे. संजय राऊत यांच्या नावे दादरमध्ये एक घर आहे. भांडुप आणि आरे मिल्क कॉलनीमध्ये एक एक घर आहे.