लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभिषेक घोसाळकर हत्येनंतर मुंबईतील ११,५०० शस्त्र परवान्यांची पडताळणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या राजकीय व्यक्ती, व्यावसायिक तसेच सुरक्षारक्षक यांच्याकडे असणाऱ्या शस्त्राच्या परवान्याची माहिती घेण्यात यावी. त्याचबरोबर ज्यांचे परवाने संपलेले आहेत किंवा ज्यांच्याकडे परवानेच नाहीत, बोगस शस्त्र परवाने बाळगणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्यात यावी, असेही आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.
मुंबईतील अनेक सुरक्षारक्षक स्वतःकडे परराज्यातील शस्त्र परवाने बाळगत आहेत. त्यातील अनेकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत किंवा संपले आहेत. त्यांचे शस्त्र आणि परवाने जप्त करून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यात परवानाधारकांची चौकशी तसेच कुंडली काढण्यास सुरूवात झाली आहे. परवानाधारक मंडळींचे कुणाशी वाद आहेत का? ते सध्या काय करतात? ते स्वतः कुठल्या तणावात आहेत का? अशा विविध गोष्टींचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी गस्तीवर असलेल्या पोलिसांना दक्ष राहून सर्व राजकीय घडामोडी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.