आशिष सिंह, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अहमदनगर येथील कनिष्ठ महाविद्यालयात बारावीची परीक्षा सुरू होण्याच्या एक तास आधी फुटलेला गणिताचा पेपर मिळवणाऱ्या ११९ विद्यार्थ्यांची यादी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या चौकशीत उघड झाली आहे. दरम्यान बारावी परीक्षा मंडळाचा येथील विभागीय सदस्य या प्रकरणात संशयाच्या घेऱ्यात सापडला आहे.
मातोश्री भागुबाई भांबरे कृषी आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेसाठी ३३७ विद्यार्थी बसले होते. त्यातील ११९ विद्यार्थ्यांना त्यांचेच महाविद्यालय हे परीक्षा केंद्र आले होते. या ११९ विद्यार्थ्यांव्यतिरिक्त २१८ विद्यार्थ्यांना वेगवेगळी परीक्षा केंद्रे आली होती. त्यातील ज्या विद्यार्थ्यांनी पेपरसाठी पैसे दिले होते त्यांनाही महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने एका व्हाॅट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून पेपर पाठवला होता. काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून पोलिस तपासामुळे आपल्या पाल्यांचे परीक्षेकडे दुर्लक्ष होण्याची अथवा ते घाबरण्याची धास्ती पालकांना वाटत असल्याने चौकशी धीम्या गतीने सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
विभागीय मंडळ सदस्यावर प्रत्येक परीक्षा केंद्रांहून येणाऱ्या रनर टीमला पेपर सेट देण्याची तसेच ज्या परीक्षा केंद्रात परीक्षा होत आहेत तेथे परीक्षा पेपर सेट पोहोचवणारी रनर टीम त्याच महाविद्यालयाची नसून दुसऱ्या महाविद्यालयाचीच आहे ना हे पाहण्याचीही जबाबदारी असते. मात्र, या प्रकरणात नेमके उलटे घडले. मातोश्री भागुबाई भांबरे कृषी आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रात त्याच महाविद्यालयाची रनर टीम आली आणि विभागीय मंडळ सदस्याने त्यांना पेपर दिले. त्या रनर टीमने वाटेत पेपर उघडले आणि त्याचे फोटो काढून पेपर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याआधीच विद्यार्थ्यांना पाठवले. त्याचमुळे विभागीय मंडळ सदस्याभोवती संशयाचे धुके जमा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
विभागीय मंडळ सदस्याच्या जबाबदारीत अधिक स्पष्टता यावी यासाठी कायदेशीर सल्ला, तसेच गॅझेट तपासण्यात येत असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि या कनिष्ठ महाविद्यालयाचा मालक सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. त्याचप्रमाणे ३ मार्चला गणिताचाच पेपर फुटला की अन्य पेपरही फुटले याचीही चौकशी करण्यात येत आहे.
- मातोश्री भागुबाई भांबरे कृषी आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाकडून पेपर फोडण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांकडून पैसे उकळण्यात आले होते.
- महाविद्यालयाचा निकाल उत्तम लागावा, असे व्यवस्थापन आणि शिक्षकांना वाटत होते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळावेत आणि भविष्यात या महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढावे यासाठी परीक्षेत मदत करण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून पैसे घेण्यात आले होते.
- परीक्षेत व्यवस्थापन आणि शिक्षक मदत करतील, असे आश्वासन देत आधीपासूनच व्हाॅट्सॲप ग्रुपही तयार करण्यात आले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"