पोषणावर १,१९० कोटी; तर मानधनावर १,३०० कोटींचा खर्च, मुंबईत आज ‘ताई’चा आवाज घुमणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 02:57 AM2017-09-27T02:57:21+5:302017-09-27T02:57:27+5:30

अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनावर शासन वार्षिक ९२६ कोटी रुपये खर्च करते. नुकत्याच जाहीर केलेल्या मानधनवाढीसाठी साधारण ३११.३३ कोटी रुपये लागणार आहेत.

1,190 crores for nutrition; If you spend Rs 1,300 crores on Dhanand, Mumbai will get 'tai' voice today | पोषणावर १,१९० कोटी; तर मानधनावर १,३०० कोटींचा खर्च, मुंबईत आज ‘ताई’चा आवाज घुमणार

पोषणावर १,१९० कोटी; तर मानधनावर १,३०० कोटींचा खर्च, मुंबईत आज ‘ताई’चा आवाज घुमणार

Next

मुंबई : बालकांच्या पोषण आहारावर वर्षाकाठी ११९० कोटी रुपये खर्च केले जात असताना हा आहार बालकांना देण्याची जबाबदारी असलेल्या अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनावर तब्बल १३०० कोटी रुपये शासन खर्च करीत असल्याचे वास्तव महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी आंदोलनकर्त्या संघटनांसमोर मांडले आणि आणखी मानधनवाढ देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे संपकरी संघटनांशी चर्चा फिसकटली.
अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनावर शासन वार्षिक ९२६ कोटी रुपये खर्च करते. नुकत्याच जाहीर केलेल्या मानधनवाढीसाठी साधारण ३११.३३ कोटी रुपये लागणार आहेत. शिवाय भाऊबीजही दुप्पट केली असून त्यासाठी साधारण ५२ कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यामुळे मानधनासाठी १३०० कोटी रुपये लागतील. म्हणजे पोषणापेक्षा मानधनावर अधिक खर्च होणार आहे, याकडे मुंडे यांनी लक्ष वेधले.
मुख्यमंत्री विदेश दौºयावर आहेत, वित्त मंत्री मुंबईत नाहीत. ते परतल्यानंतर शेवटचा प्रयत्न म्हणून आपण मानधनवाढीबाबत त्यांच्याशी चर्चा करू. मात्र, सरकारची सद्यस्थिती लक्षात घेता सहकार्याची भूमिका घेत संप मागे घ्यावा, असे आवाहन मुंडे यांनी केले. आपल्या मागण्यांसाठी बालकांना उपाशी ठेवणे चुकीचे आहे, असे त्यांनी बजावले.
चार दिवसांपूर्वी जाहीर केलेल्यामानधनवाढीनंतर राज्यात कालपर्यंत ११ हजार २३५ अंगणवाडी सेविका, ११ हजार ०८६ मदतनीस व १ हजार २१२ मिनी अंगणवाडी सेविका कामावर हजर झाल्या आहेत. याशिवाय ७ हजार १६१ इतक्या आशा वर्करमार्फत पोषण आहार पुरवठ्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. कालपर्यंत राज्यातील साधारण २८ हजार ५३९ अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पुरवठ्याचे काम सुरु झाले असून, उद्यापर्यंत साधारण ५० हजार अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पुरवठा सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
रॉयलस्टोन या मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस महिला -बालविकास विभागाच्या सचिव विनिता वेद-सिंगल, एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे आयुक्त कमलाकर फंड, उपसचिव लालसिंग गुजर, अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी एम. ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, भगवान देशमुख आदी उपस्थित होते.

मुंबईत आज ‘ताई’चा आवाज घुमणार!
मानधनवाढीसह विविध मागण्यांसाठी संपावर गेलेले अंगणवाडी कर्मचारी, बुधवारी, २७ सप्टेंबरला आझाद मैदानावर शक्तिप्रदर्शन करणार आहेत. या वेळी राज्यातील सुमारे ५० हजार अंगणवाडीसेविका आणि मदतनीस उपस्थित राहतील, असा दावा अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या वेळी मोर्चाला संबोधित करणार असल्याने, कर्मचाºयांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे.

सरकारने दिलेल्या मानधनवाढीने राज्याच्या तिजोरीवर ३६० कोटी रुपयांचा वार्षिक बोजा पडणार आहे. त्याऐवजी एक हजार कोटींचा बोजा सहन करून दोन टप्प्यात मानधनवाढ द्यावी, अशी आमची मागणी आहे. सध्या सरकारने दिलेली मानधनवाढ आम्हाला मान्य नाही. त्यामुळे संप सुरूच राहील. - एम.ए.पाटील

Web Title: 1,190 crores for nutrition; If you spend Rs 1,300 crores on Dhanand, Mumbai will get 'tai' voice today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई