मुंब्य्रात ११९६ बांधकामे जमीनदोस्त
By admin | Published: May 5, 2016 01:02 AM2016-05-05T01:02:04+5:302016-05-05T01:02:04+5:30
ठाणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंब्य्राच्या मुख्य रस्त्यावर उभ्या राहिलेल्या हजारो अनधिकृत बांधकामांवर बुधवारी कारवाईचा बडगा उचलण्यात आला.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंब्य्राच्या मुख्य रस्त्यावर उभ्या राहिलेल्या
हजारो अनधिकृत बांधकामांवर बुधवारी कारवाईचा बडगा उचलण्यात आला.
आधीच नोटिसा दिल्याने अनेक व्यावसायिकांनी स्वत:हून बांधकामे तोडल्यानंतरही जवळपास १,१९६ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. महापालिका
आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या उपस्थितीत मोठ्या बंदोबस्तात ही धडाकेबाज कारवाई पार पडली.
या कारवाईत १८२ पत्र्याचे गाळे, १५८ पक्के बांधलेले गाळे, १८२
टपऱ्या, ४५६ शेड, ६८ चायनीज
आणि चिकन विक्रीचे गाळे, ६४ गॅरेज, ८० चहाच्या टपऱ्या, लाकडाच्या चार वखारी, कंटेनरमध्ये सुरू असलेली दोन दुकाने अशी १,१९६ अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात आली.
अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त, निमलष्करी दलाची पथके, रॅपिड अॅक्शन फोर्स, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, अन्य ५० अधिकारी यांच्यासह १५ जेसीबी, पोकलेन, जवळपास ३०० कामगार, ३०० पोलीस यांच्या सहाय्याने ही मोठी कारवाई करण्यात आली.
पोलीस उपायुक्त सचिन पाटील, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब यांच्या उपस्थितीत एकाचवेळी सात ठिकाणी या कारवाईला प्रचंड पोलिस बंदोबस्तात सुरूवात करण्यात आली. पोलिस आयुक्त सिंग आणि महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी सकाळी या संपूर्ण कारवाईची पाहणी केली. यावेळी जयस्वाल यांनी मुख्य रस्त्यावरील सर्व अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
कोंडी फुटण्यास मदत
मुंब्य्रात यापूर्वीही अतिक्रमणे हटविण्याची कारवाई झाली होती. मात्र नंतरच्या काळात ती थंडावली. तोवर पुन्हा मुख्य रस्त्यावर अतिक्रमणे झाली. त्यामुळे रस्ता रूंदीकरण होऊनही वाहतुकीचा प्रश्न सुटला नव्हता. सतत कोंडी होत होती. मुंब्य्रात बायपास होऊनही शहरातील कोंडीचा प्रश्न सुटला नव्हता.
रेल्वे स्टेशनचा परिसर मोकळा करूनही त्याचा फारसा उपयोग झाला नव्हता. त्यामुळे पालिकेने नव्याने नोटिसा बजावल्या. त्यात जे अतिक्रमणे तोडणार नाहीत. त्यांना दंड ठोठावून पुन्हा अतिक्रमणे तोडण्याचा खर्चही वसूल केला जाणार असल्याने गेल्या दोन दिवसांत रात्ररात्र जागून अनेकांनी आपली अतिक्रमणे हटवली. त्यानंतरही पालिकेली दिवसभर मोठी कारवाई राबवावी लागली.
या करावाईविरोधात यापूर्वीइतका रोष नसला, तरी खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्ताचा ताफा तयार होता. यापूर्वी या करावाईला विरोध करणाऱ्या नेत्यांनीही पालिका निवडणुकीच्या तोंडावर विकासकामे सांगता यावी, म्हणून या कारवाईला पाठिंबा दिला किंवा ते या परिसरात फिरकलेच नाहीत. त्यामुळे कारवाईविरोधात फारसे वातावरण तयार झाले नाही.
वीजपुरवठा बंद
अतिक्रमणे तोडण्याच्या कारवाईत वीजवाहिन्याही तुटू शकतात. त्यातून काही दुर्घटना होऊ नये म्हणून मुंब्रा आणि कौसा परिसरातील वीजपुरवठा सकाळी कारावई सुरू होतानाच बंद करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना दिवस विजेविना काढावा लागला.