अकरावी प्रवेश: पालकांमध्ये संभ्रम, कॉलेजकडून जास्त फीची मागणी होत असल्याची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 05:58 AM2024-09-03T05:58:48+5:302024-09-03T06:01:36+5:30
11th admission: सप्टेंबर महिना उजाडला, तरी मुंबईमध्ये अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले नसल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यातच आता विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी गेलेल्या विद्यार्थी आणि पालकांकडून वेबसाइटवर दर्शविलेल्यापेक्षा जास्त फी मागितली जात असल्याचे प्रकार आता समोर आले आहेत.
मुंबई - सप्टेंबर महिना उजाडला, तरी मुंबईमध्ये अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले नसल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यातच आता विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी गेलेल्या विद्यार्थी आणि पालकांकडून वेबसाइटवर दर्शविलेल्यापेक्षा जास्त फी मागितली जात असल्याचे प्रकार आता समोर आले आहेत.
२८ ऑगस्ट रोजी अकरावीच्या विद्यार्थ्यांची चौथ्या विशेष प्रवेश प्रक्रियेची यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये अनुदानित महाविद्यालयांची ३०० ते ७००, तर विनाअनुदानित महाविद्यालयांची ५ हजार ते ९ हजार पाचशेपर्यंत फी असल्याचे दिसत आहे. मात्र, शिक्षण खात्याकडून फी अपडेट झाली नसल्याचे कॉलेज प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
९ हजारऐवजी २० हजार रुपये!
पनवेलमधील केएसए बार्न्स कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयासाठी वेबसाइटवर ९ हजार पाचशे रुपये फी आहे.
येथे पाल्याचे ॲडमिशन घेण्यास गेलेल्या पालकांना तेथे २० हजार सातशे रुपये फी भरण्यास सांगण्यात आले.
याबाबत विचारणा केली असता हीच फी आहे. ॲडमिशन घ्या, नाहीतर पुढच्या लिस्टमध्ये येईल, त्या दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या, असे उत्तर देण्यात आल्याचे एका पालकाने सांगितले.
महाविद्यालय प्रशासनाने वेबसाइटवर दर्शविण्यात आलेली फी विद्यार्थ्यांकडून घ्यावी, असे निर्देश महविद्यालयांना देण्यात आले आहेत. जर कोणत्या महाविद्यालयांकडून जास्तीची फी मागितली जात असेल, तर पालकांनी तशी लेखी तक्रार करावी, त्याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
- संदीप संगवे, विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग.