- अतुल कुलकर्णी
मुंबई : गेल्या वर्षी ज्या पद्धतीने अकरावीचे प्रवेश झाले त्याच पद्धतीने या वर्षी प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करावी, असा सूर मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटला. याबाबत अंतिम निर्णय शालेय शिक्षण विभाग जाहीर करणार आहे.मराठा आरक्षणाचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. राज्य सरकारने तसेच याचिकाकर्त्यांनी घटनापीठाची मागणी केली आहे. त्यावर निर्णय अद्याप झालेला नाही. तो निर्णय झाल्यानंतर सुनावणी सुरू होईल, व निकाल येईल, तोपर्यंत अकरावीचे प्रवेश प्रलंबित राहिले, तर विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते होऊ न देता जुन्याच पद्धतीने अकरावीचे प्रवेश पूर्ण करावेत यावर सगळ्यांचे एकमत झाल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर अनेकांनी हा विषय उपस्थित केला. तेव्हा कोणत्या पद्धतीने प्रवेश केले जावेत, सध्या काय परिस्थिती आहे, यावर विस्तृत चर्चा झाली. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे अर्धे वर्ष वाया गेले आहे. विद्यापीठांना त्यांचे वेळापत्रक तयार करायचे आहे. परीक्षांचे विषय आहेत. मुलांचे अकरावीच्या प्रवेशामुळे होणारे नुकसान पुढच्या शैक्षणिक कालावधीसाठी अडचणीचे ठरू शकते. हे सगळे मुद्दे विचारात घेऊन अकरावीचे प्रवेश जुन्याच पद्धतीने करावेत असा सूर या बैठकीत निघाला. याबाबतचा निर्णय आता शालेय शिक्षण विभाग लवकरच जाहीर करणार आहे असेही सूत्रांनी स्पष्ट केले.