Join us

प्रवेशाविना सुरू होणार ११वीचा ऑनलाइन अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 7:12 AM

अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासाचा हा उपक्रम या आठवड्यात सुरू करण्याचा विचार असल्याचे एससीईआरटीचे संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले.

मुंबई : मराठा आरक्षणाचा निर्णय आणखी ४ आठवडे लांबणीवर पडल्याने अकरावी प्रवेश प्रक्रिया केव्हा आणि कशी सुरू होईल, याबाबत संदिग्धता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता प्रवेशाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) घेतला आहे.                  अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासाचा हा उपक्रम या आठवड्यात सुरू करण्याचा विचार असल्याचे एससीईआरटीचे संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले. विज्ञान, वाणिज्य, कला या शाखांमधील सर्वाधिक घेण्यात येणारे विषय किंवा बंधनकारक असलेल्या विषयांच्या तासिका ऑनलाइन उपलब्ध हाेतील. तसेच कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश झाला नसेल तरीही पसंतीच्या शाखेतील अभ्यास सुरू करता येईल. एकापेक्षा अधिक शाखांचा अभ्यास करता येऊ शकेल. जेणेकरून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, तेव्हा कोणते विषय आवडतात त्यानुसार विद्यार्थ्यांना निर्णय घेणेही सोपे होईल, असे पाटील म्हणाले.या ऑनलाइन तासिका कशा आणि किती वेळासाठी उपलब्ध होतील यासंदर्भातील अधिक माहिती लवकरच देण्यात येणार आहे.शासन स्तरावरून काेणताही निर्णय येईपर्यंत प्रवेशाबद्दल सांगणे कठीण आहे. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी, त्यांना प्रवेश न घेताही हव्या त्या शाखेचा अभ्यास सुरू करता यावा यादृष्टीने हा प्रयत्न आहे.- दिनकर पाटील, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

टॅग्स :शिक्षण क्षेत्रविद्यार्थी