सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमाला प्राइम टाइम देण्याची घोषणा केल्यानंतर बरीच चर्चा रंगली. आता या वेळेत फेरबदल करण्याचा निर्णयही करण्यात आला आहे. दुपारी १२ ते रात्री ९ पर्यंत प्राइम टाइम असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांच्याशी सायली कडू यांनी साधलेला हा संवाद. सरकारच्या नवीन भूमिकेमुळे मराठी चित्रपटसृष्टीला कसा फायदा होईल?- केवळ ६ ते ९ पर्यंतचा प्राइम टाइम न ठेवता, तो १२ ते ९ करून सरकारने मराठी चित्रपटसृष्टीचे हितच जपले आहे. याआधी मल्टिप्लेक्समध्ये सकाळी साडेआठ, साडेनऊ, पावणेअकरा असे शो लावत होते. एकूण ११२ शो देऊ, असे सांगून बोळवण करायचे. मात्र या शोना प्रेक्षक यायचेच नाहीत. आता ही वेळ १२ ते ९ देऊन मराठी चित्रपटांना याचा फायदाच होईल.मराठी चित्रपटांना यामुळे उत्तेजन मिळेल असे वाटते का?- हो नक्कीच. प्रत्येक चित्रपटाचा विषय आणि शैली वेगळी आहे. प्रत्येक चित्रपटाचा प्रेक्षकवर्गही वेगळाच आहे. त्या अनुषंगाने विशिष्ट प्रेक्षकांसाठी त्या वेळेतच तो सिनेमा दाखवला जाईल. ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’ यासारख्या चित्रपटांचा प्रेक्षक वेगळा आहे. ‘क्लासमेट्स’चा प्रेक्षकवर्ग वेगळा आहे. यामुळे प्रत्येक चित्रपट आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. हिंदी सिनेमा ज्याप्रमाणे चॅनेलाइज्ड आहे. तसेच मराठीचेही आता होऊ शकेल. अनेकदा मल्टिप्लेक्सवाले परस्पर शो टाइम बदलतात यालाही त्यामुळे आळा बसेल. ६ ते ९ ही वेळ हटवण्याचा विचार नेमका कोणी मांडला? निर्मात्यांनी की मल्टिप्लेक्स मालकांनी?- हा विचार मल्टिप्लेक्सच्या मालकांनी मांडला. मराठी चित्रपटाचा महाराष्ट्रात खूप मोठा प्रेक्षकवर्ग आहे. वेगवेगळे चित्रपट वेगवेगळ्या वेळेला खूप चालतात. त्यामुळे तुम्ही केवळ ६ ते ९ ही वेळ घेऊन बसू नका, असे त्यांनी सांगितले. शेवटी आम्हालाही व्यवसाय करायचा आहे, नफा कमवायचा आहे. तर याच ठरावीक वेळेपुरते मर्यादित राहू नका, असेही मल्टिप्लेक्सच्या मालकांकडून सुचविण्यात आले. त्यामुळे विस्तारित वेळ असेल तर सर्वांच्याच फायद्याचे ठरेल, असाही सल्ला त्यांनी दिला.दक्षिणेत प्रादेशिक चित्रपट इतर भाषेच्या चित्रपटांंहून अधिक चालतात, यामागचे कारण काय?- दक्षिणेत त्यांच्या भाषेखेरीज दुसऱ्या भाषेच्या चित्रपटांची जाहिरात अधिक केली जात नाही. तेथील प्रेक्षकसुद्धा प्रादेशिक भाषेतील चित्रपटालाच प्राधान्य देतात. त्यामुळे तेथे असे वाद होतच नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांनीही मराठी चित्रपटांना मोठ्या संख्येने पाहिले पाहिजे. मराठी सिनेमांना भक्कम आधार प्रेक्षकांमुळेच मिळेल.प्रेक्षकांबरोबरच निर्माते दिग्दर्शकांची उत्कृष्ट चित्रपट तयार करण्याची जबाबदारी आता वाढली आहे, असे वाटते का?- निर्माते आणि दिग्दर्शकांची जबाबदारी नक्कीच वाढेल. त्यांनी उत्कृष्ट सिनेमा तयार करण्यासाठी मेहनत घेतलीच पाहिजे. सरकार, मल्टिप्लेक्स आता तुम्हाला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे निर्मात्यांची जबाबदारी नक्कीच वाढली आहे. थातूरमातूर चित्रपट तयार केल्यास प्रेक्षक चित्रपटगृहात जाणारच नाहीत. शेवटी प्रेक्षकच ठरवतील कोणता चित्रपट बघायचा ते.कोणत्या तांत्रिक अडचणीमुळे प्राइम टाइम ठरवण्याची वेळ आली?- ही वेळ ठरवण्याचे मुख्य कारण म्हणजे एखादा हिंदी सिनेमा प्रदर्शित झाल्यावर मराठी चित्रपट तेथून काढण्यात यायचे. या तांत्रिक अडचणीमुळे मराठी चित्रपटांना स्क्रीनच मिळत नव्हत्या. हिंदी आणि मराठीचे एकाच वेळी शो लागतील. त्यामुळे प्रेक्षक ठरवतील कोणता चित्रपट पाहायचा ते. आता १२० शो प्राइम टाइममध्ये दाखवण्याचे त्यांना बंधनकारक केले आहे.चित्रपट महामंडळाकडून मराठी निर्मात्यांना काय सल्ला द्याल?- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी निर्माते आणि दिग्दर्शकांची सभा घेणार आहे. प्रत्येकाने आता ठरवून नियोजनबद्धतेने चित्रपट प्रदर्शित करावा. शेवटी प्रत्येक जण या व्यवसायात आहे, प्रत्येकालाच पैसा कमवायचा आहे. ज्याप्रमाणे हिंदीत सलमानच्या चित्रपटावेळी आमीर किंवा शाहरूखचे चित्रपट येत नाहीत त्याप्रमाणे आपणही एकमेकांचे पाय न खेचता सर्वांनी एकत्रितपणे काम करावे.
१२ ते ९ वेळ अधिक फायद्याची
By admin | Published: April 12, 2015 12:04 AM