पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील १२ पूल होणार मजबूत; २३ कोटी ६८ लाख खर्च

By जयंत होवाळ | Published: March 19, 2024 08:07 PM2024-03-19T20:07:24+5:302024-03-19T20:07:38+5:30

हे काम दोन टप्प्यात होणार आहे. काही कामे पावसाळ्यापूर्वी, तर काही कामे पावसाळ्यानंतर केली जाणार आहेत.

12 bridges on East, West Expressway will be constructed at a cost of 23 crore 68 lakhs | पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील १२ पूल होणार मजबूत; २३ कोटी ६८ लाख खर्च

पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील १२ पूल होणार मजबूत; २३ कोटी ६८ लाख खर्च

मुंबई : नव्या उड्डाणपुलाची उभारणी आणि जुन्या पुलांची पुनर्बांधणी करतानाच याआधी हाती घेण्यात आलेल्या १६ पुलांची कामे मार्गी लावण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबई महापालिकेने ४ हजार ८३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्या जोडीला आता पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील १२ उड्डाणपुलांसह भुयारी मार्गांची दुरुस्ती करून त्यांचे बळकटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी २३ कोटी ६८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

हे काम दोन टप्प्यात होणार आहे. काही कामे पावसाळ्यापूर्वी, तर काही कामे पावसाळ्यानंतर केली जाणार आहेत. २०१८ मध्ये अंधेरी येथील गोखले पुलाचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर सगळ्याच पुलांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यानुसार पुलांची सुरक्षा तपासण्यात आली. काही पूल हे पालिकेच्या हद्दीत आहेत, तर काही पूल रेल्वेच्या हद्दीत आहेत. त्यामुळे संयुक्त तपासणी करण्यात आली. त्यानंतर कोणत्या पुलांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, याची यादी तयार करण्यात आली. या यादीतील पुलांची दुरुस्ती करून ते मजबूत केले जाणार आहेत. एक प्रकारे पुलांचे आयुर्मान वाढण्यावर भर आहे.
दुरुस्तीसाठी निवडण्यात आलेले १२ पूल दोन्ही द्रुतगती महामार्गावरील आहेत. यापूर्वी हे महामार्ग आणि त्यांच्या डागडुजीची जबाबदारी एमएमआरडीएकडे होती. अलीकडेच हे महामार्ग एमएमआरडीएने पालिकेकडे हस्तांतरित केले आहेत. या महामार्गावरील पुलांची आणि भुयारी मार्गांची डागडुजी करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे.

-----------
प्रगतीपथावर कामे

काही पुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यात विक्रोळी रेल्वे उड्डाणपूल, गोखले पूल, विद्याविहार रेल्वे पूल, माहीम कॉजवे येथील मिठी नदीवरील पूल आदी पुलांचा समावेश आहे. ज्या १२ पुलांची कामे होणार आहेत त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. सर्वाधिक कामे सांताक्रूझ- चेंबूर लिंक रोडवरील पुलांची आहेत.
--------

या पुलांची होणार दुरुस्ती -
कुर्ला एलबीएस जंक्शनवरील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड

चेंबूर अण्णा भाऊ साठे पूल
चेंबूर अमर महल जंक्शन पूल

घाटकोपर मानखुर्द लिंक रोड
घाटकोपर अंधेरी-गोरेगाव लिंक रोड पूल

मुलुंड नवघर पूल
पूर्व उपनगरातील रेल्वे उड्डाणपुलावर क्रॅश बॅरिअर्स

शिव-पनवेल महामार्ग आणि महाराष्ट्र नगरला जोडणारा भुयारी मार्ग
सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड एलटीटी ते कुर्ला यामधील टप्पा

सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवर कुर्ल्यातील डबलडेकर पूल
पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडला चेंबूर येथे जोडणी

चेंबूर स्वामी नारायण उड्डाणपूल

Web Title: 12 bridges on East, West Expressway will be constructed at a cost of 23 crore 68 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई