Join us

संतापजनक! १२ इमारती, १० हजार रहिवासी, पाणी मात्र बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 10:04 AM

मागठाण्यात १० टक्के पाण्यावर दिवस काढत आहेत नागरिक!

राजेश पिल्लेवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बोरिवली पूर्व उपनगरातील मागठाणे भागातील १२ इमारती, ट्रान्झिट कॅम्प, टाॅवरमध्ये राहणारे १० ते १२ हजार लाेक तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहेत.  संतप्त नागरिकांनी भल्या पहाटे पाच वाजता म्हाडा पंपिंग स्टेशनवर धडक दिली. पालिकेची पाणीकपात १० टक्के असताना आमच्यासाठी ९० टक्के पाणीकपात कशी, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

महापालिकेकडून सध्या दहा टक्के पाणीकपात सुरू आहे. मात्र, तीन दिवसांपासून या भागात अत्यंत कमी दाबाने पाणी दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरातील नळांना अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ पाणी नसते. पिण्याचे पाणीदेखील मिळत नाही. त्यामुळे शेकडो लोकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. तसेच, नाईलाजाने पाणी विकत आणावे लागत असल्याची तक्रार करतानाच हा प्रश्न तत्काळ निकाली निघाला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा लोकांनी दिला आहे.

पाणी वितरणात असमानता:

मागठाणेतील टाटा पॉवर, जय महाराष्ट्रनगर हा परिसर मोठा असून या भागात आधी ‘म्हाडा’च्या १७ इमारती होत्या. आता १२ आहेत. ३ इमारतींचा पुनर्विकास झाला, तर २ इमारतींचा सुरू आहे. लोकसंख्या वाढली. मात्र, पाणी वितरणाचे सुधारित नियोजन झाले नाही. त्यामुळे वारंवार कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते.

नवीन टाकी असुरक्षित:

‘म्हाडा’च्या पंपिंग स्टेशनची जुनाट यंत्रणा अलीकडेच बदलून नवीन टाकी बांधण्यात आली. मात्र, टाकीच्या सभोवताल सुरक्षा भिंत नसल्याने येथे रात्री असामाजिक तत्त्वांचा वावर असतो. टाकीत मद्याच्या बाटल्या पडलेल्या दिसतात. थातूरमातूर झाकणे लावण्यात आली आहेत. त्यात चुकून लहान मुले पडून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणीव्यवस्थेची संयुक्त जबाबदारी म्हाडा आणि महापालिकेची आहे. अनेकदा दोन्ही यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवतात. बांधकामांमुळे पाइपलाइन फुटल्यानंतर या जुगलबंदीचा प्रत्यय विशेषत्वाने येतो.

मागठाणेतील पाणी टंचाईसंदर्भात मला कल्पना नाही. माझ्याकडे एकही तक्रार आलेली नाही.- संध्या नांदेडकर, वॉर्ड अधिकारी, आर-मध्य विभाग

तक्रारीनंतर पहाटे कनिष्ठ अभियंता उपस्थित:

जय महाराष्ट्रनगर को. ऑप. हाउसिंग फेडरेशनने आर मध्य विभागाकडे बुधवारी तक्रार केली. गुरुवारी पहाटे पाच वाजता नागरिक पंपिंग स्टेशनवर पोहोचले. पाणी वितरण व्हॉल्व्हचीही तपासणी झाली. यावेळी महापालिकेचे एक कनिष्ठ अभियंता उपस्थित होते. आंदोलनात कांचन सार्दळ, श्वेता बोऱ्हाडे, रोहिणी चौगुले, शैला गायकवाड, वनिता दळवी, चेतन जगताप, विजय पडकील, प्रवीण कदम, अशोक चव्हाण, राजन सावंत, केतन शेष आदींनी भाग घेतला.

मागठाणेत नवीन इमारती झाल्या. लोकसंख्या वाढली. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन आणि पाणी वितरण व्हावे. म्हाडाने जुनी टाकी तोडू नये, अन्यथा पाणीटंचाई आणखी तीव्र होईल. - कांचन सार्दळ, सामाजिक कार्यकर्त्या.

पालिकेचे व म्हाडाचे पाणी नियोजन ५० वर्षांपूर्वीचे आहे. आता ट्रान्झिट कॅम्प, नवे ३ टॉवर झाले. त्यानुसार उपाययोजना व्हावी. फेडरेशनने वारंवार पाठपुरावा केला; पण कुणीच प्रतिसाद देत नाही. -चेतन जगताप, खजिनदार, जय महाराष्ट्रनगर को. ऑप. हाउसिंग फेडरेशन

टॅग्स :बोरिवलीमागाठाणेपाणीकपात