Join us

पेंग्विन कक्षामुळे राणीबागेच्या उत्पन्नात १२ कोटींची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आगामी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय आखाडे रंगू लागले आहेत. भाजप पक्षाने आक्रमक भूमिका घेत शिवसेनेची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आगामी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय आखाडे रंगू लागले आहेत. भाजप पक्षाने आक्रमक भूमिका घेत शिवसेनेची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून विरोधकांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भायखळा येथील राणीबागेतील पेंग्विनच्या देखभालीसाठी १५ कोटी खर्च करण्यास काँग्रेस, भाजप आणि मनसेकडून विरोध केला जात आहे. मात्र पेंग्विन आल्यानंतर राणीबागेच्या उत्पन्नात मागील तीन वर्षांत १२ कोटींची वाढ झाल्याचा दावा पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केला आहे.

राणीबागेतील सात पेंग्विनच्या देखभालीकरिता १५ कोटी रुपयांचे कंत्राट दिले जाणार आहे. मात्र हा खर्च अनावश्यक असून प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांमार्फतच देखभाल करण्यात यावी, अशी सूचना काँग्रेस आणि भाजपने केली आहे. तर खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी? अशी पोस्टरबाजी मनसेने मुंबईभर सुरू केली आहे. मात्र याचे प्रत्युत्तर सत्ताधारी पक्षाकडून नव्हे तर पालिका आयुक्तांकडून देण्यात आले आहे. याआधी कोस्टल रोड प्रकल्पातील घोटाळ्याच्या आरोपांचा आयुक्तांनी समाचार घेतला होता.

निविदा रद्द करण्याची मागणी फेटाळली

पेंग्विन कक्षासाठी प्रशासनाकडून पुरेसे मनुष्यबळ व यंत्रणा उभारून नियमित देखभाल करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या कंत्राटावर होणारा खर्च कमीत कमी राहील, याची तजवीज यापूर्वीच केली आहे. त्यामुळे हा खर्च निविदेतून आपोआप कमी होणार आहे. अशा आणखी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे निविदा मागे घेण्याचा किंवा रद्द करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

* पेंग्विन कक्षाच्या उभारणीपूर्वी एप्रिल २०१४ ते मार्च २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत प्राणिसंग्रहालयाचे उत्पन्न दोन कोटी १० लाख होते.

* पेंग्विन कक्षाच्या उभारणीनंतर एप्रिल २०१७ ते मार्च २०२० या कालावधीत प्राणिसंग्रहालयाचे उत्पन्न १४ कोटी ३६ लाख झाले. म्हणजेच उत्पन्नात १२ कोटी २६ लाख रुपयांची वाढ झाली आहे.

* पेंग्विन कक्षानिमित्त प्राणिसंग्रहालयात आलेल्या पर्यटकांमुळे वाहनतळ, उपाहारगृह आदींच्या माध्यमातूनदेखील उत्पन्नात भर पडली आहे.