Join us

Tanhaji Movie : प्रदर्शनाच्या 12 दिवसांनंतर 'तान्हाजी' टॅक्स फ्री, अजय देवगण म्हणाला..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 5:51 PM

Tanhaji Movie : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांमधील शूरवीर तानाजी मालुसरेंच्या कोंढाणा किल्ल्याची

मुंबई : अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या, शूरवीर तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित चित्रपट ''तान्हाजी': द अनसंग वॉरियर' हा महाराष्ट्रात करमुक्तकरण्यात आला आहे. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे प्रदर्शनानंतर तब्बल 12 दिवसांनी हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. तरीही, अजय देवगणने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आभार मानले आहेत.   

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांमधील शूरवीर तानाजी मालुसरेंच्या कोंढाणा किल्ल्याची शौर्यगाथा 'तान्हाजी' चित्रपटाच्या माध्यमातून 70 मिमी पडद्यावर आली आहे. 'तान्हाजी' या चित्रपटाने 2020मधील 100 कोटींचा टप्पा गाठणारा पहिला चित्रपट म्हणून मान मिळविला आहे. हा चित्रपट उत्तर प्रदेश, हरयाणा सरकारने करमुक्त केला आहे. त्यानंतर हा चित्रपट महाराष्ट्रातही करमुक्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. अखेर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'तान्हाजी' चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. या चित्रपटासाठी चित्रपटगृहांनी तिकिटदरावर लागू असलेला राज्य वस्तू व सेवा कर (एसजीएसटी) प्रेक्षाकांकडून वसूल न करता चित्रपटगृहाने स्वत: राज्य शासनाच्या तिजिरोत भरण्याचा निर्णय झाला. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून 30 एप्रिल 2020 पर्यंतच्या कालावधीतील तिकिट विक्रीवरील राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा देण्यास मान्यता देण्यात आली.

महाराष्ट्रात तानाजी चित्रपट करमुक्त होताच, अजय देवगणने उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत. यापूर्वीही हरयाणा आणि उत्तर प्रदेशात हा चित्रपटा करमुक्त करण्यात आला होता. त्यावेळीही, अजय देवगणने दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले होते.  कोंढाणा किल्ला घेताना धारातिर्थी पडलेल्या तानाजी यांच्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे म्हटले होते. त्यानंतर, कोंढाणा या किल्ल्यास सिंहगड असे नाव देण्यात आले. पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ला म्हणून सिंहगड गणला जातो. महाराष्ट्राच्या रणभूमीत तानाजी मालुसरेंनी पराक्रम गाजवला. त्यामुळे, अजय देवगणची भूमिका असलेला 'तान्हाजी' चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा, अशी मागणी करण्यात येत होती.  

टॅग्स :तानाजीशिवसेनाउद्धव ठाकरेकरमंत्री