एका खड्ड्यात पुरले १२ मृतदेह
By admin | Published: September 26, 2015 03:06 AM2015-09-26T03:06:31+5:302015-09-26T03:06:31+5:30
प्रत्येक मृतदेहासाठी वेगवेगळे खड्डे खोदून विल्हेवाट लावणे क्रमप्राप्त असताना पनवेल नगरपालिकेचे कर्मचारी एकाच खड्ड्यात सर्व बेवारस मृतदेह पुरत असल्याची धक्कादायक बाब गुरुवारी उजेडात आली आहे.
कळंबोली : प्रत्येक मृतदेहासाठी वेगवेगळे खड्डे खोदून विल्हेवाट लावणे क्रमप्राप्त असताना पनवेल नगरपालिकेचे कर्मचारी एकाच खड्ड्यात सर्व बेवारस मृतदेह पुरत असल्याची धक्कादायक बाब गुरुवारी उजेडात आली आहे.
बुधवारी वाशी येथील शवागारगृहातून एकूण १२ मृतदेह विल्हेवाट लावण्याकरिता पोलीस मित्र सोन्या मारुती याने कोळीवाडा येथे आणले. मात्र गुरुवारी सकाळी जेसीबी बोलावून एक खड्डा खोदून त्यात १२ मृतदेह गाडण्यात आले. या संदर्भात पनवेल नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बी.एस. लोहारे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता संबंधित मृतदेहाचे शवविच्छेदन करणे हे आमचे काम आहे आणि ते काही तासांत पूर्ण केले जाते. त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आमची नाही, असे ते म्हणाले.
पनवेल परिसरात जवळपास रोज अपघात घडत असून, शवविच्छेदनासाठी मृतदेह पनवेल ग्रामीण रुग्णालयात आणले जातात. अनेक मृतदेहांची ओळखही पटत नसल्याने त्यांचे वारसदार सापडत नाहीत. त्यामुळे काही मृतदेह तसेच शवागारात पडून राहतात. संबंधिताच्या वारसदाराची किमान दोन महिने वाट ँपाहते. त्यानंतर पालिका या मृतदेहाची विल्हेवाट लावते. शहरातील गुजराती स्मशानभूमीसमोरील भूखंडावर हे मृतदेह पुरण्यात येतात. यापूर्वी बेवारस मृतदेहांना एकाच खड्ड्यात पुरल्याची माहिती २0 नोव्हेंबर २0१४ रोजी उघड झाली होती.