Join us

‘कोसळधारे’त १२ जणांचा मृत्यू, तर ४०हून अधिक जखमी; आकडा वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:42 AM

अभूतपूर्व ‘कोसळधारे’मुळे झालेले दुष्परिणाम आता समोर येत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये दोन बालकांसह १२ जणांचा अंगावर भिंत पडून अथवा पाण्यात वाहून मृत्यू झाला आहे, तर ४०हून अधिक जण जखमी असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

मुंबई : अभूतपूर्व ‘कोसळधारे’मुळे झालेले दुष्परिणाम आता समोर येत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये दोन बालकांसह १२ जणांचा अंगावर भिंत पडून अथवा पाण्यात वाहून मृत्यू झाला आहे, तर ४०हून अधिक जण जखमी असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत मृत्यू व जखमींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात असून, अनेक जण बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे.मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे सायन येथील गांधी मार्केटमध्ये स्वत:च्या कारमध्ये अडकून, प्रियेन या ३० वर्षांच्या वकिलाचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला.विक्रोळी पश्चिम येथील वर्षानगरातील जनकल्याण सोसायटीत राहात असलेल्या, गोपाळ जंगम ( ३६) यांची दोन वर्षांची मुलगी कल्याणी अंगावर भिंत पडल्याने जागीच ठार झाली. या दुर्घटनेत गोपाळ व त्यांची पत्नी छाया ही जखमी झाली आहे.विक्रोळीतीलच सूर्यनगर पंचशील चाळ कमिटी येथे मंगळवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास टेकडीखालची माती खचून दोन घरे ऐकमेकांवर कोसळली. त्यामध्ये निखिल सत्येंद्र या दीड वर्षाच्या मुलासह सुरेश मौर्य या ४० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. किरणदेवी पाल (२५) गंभीर जखमी असून, तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मुसळधार पावसामुळे पवईतील फिल्टर पाडा येथे राहात असलेल्या, दिलीप कुमार सत्यकुमार झा यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर घराची भिंंत कोसळल्याने घाटकोपर येथील असल्फा गावातील सानेगुरुजी नगरातील रामेश्वर गणेश तिवारी (४५) जागीच ठार झाले. त्यांची पत्नी मंजू (३५) व मुलगा क्रिश (९) गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे सनशाइन या बांधकाम सुरू असलेल्या, २२ मजली टॉवरमधील लोखंडी पाइप बाजूच्या घरावर कोसळल्याने, दोन बालकांसह एका कुटुंबातील चौघे जण गंभीर जखमी झाले. विनिता गिरीश शहा ( ३६), त्यांची मुलगी वियाना (५), मुलगा ऐनिश (अडीच वर्षे), पुतणी वृद्धी शहा (चार) अशी त्यांची नावे असून, सर्वांवर सैफी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. समता नगरातील महिंद्रा कंपनी यलोगेटजवळील नाल्यात पडून ओमप्रकाश निर्मल (२६) हा तरुण वाहून गेला. त्याचा शोध रात्री उशिरापर्यंत लागू शकलेला नव्हता, तर दहिसर पूर्व येथील कोकणीपाड्यातील शिंगटे कंम्पाऊड येथील नाल्याचा लाकडी पूल तुटून, सायंकाळी प्रतीक सुनील घाटाळ (वय २०) व गौरेश राजेश उघडे दोघे पाण्यात पडले. नागरिकांनी प्रयत्नांची पराकष्टा करीत, गौरेश उघडेला कसेबसे बाहेर काढले. मात्र, प्रतीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.विलेपार्ले येथील ईला मार्केट येथून पाय जात असताना, अंगावर झाडाची मोठी फांदी कोसळल्याचे भिकू बामणीचा (वय ४० रा. क्रॉस रोड विलेपार्ले ) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कूपर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. एल्फिन्स्टन स्टेशनजवळील मटकर मार्ग येथील सारथी बार फितवाली चौकीच्या जवळील नाल्यातून, एक ६० वर्षांचे ज्येष्ठ नागरिक पाण्यात पडून वाहून गेले. शोध घेऊनही अद्याप ते सापडलेले नव्हते.लालबागचा राजा येथे कॉन्स्टेबल जखमीचिंचपोकळी येथे दत्ताराम लाड मार्गावर ‘लालबागच्या राजा’च्या बंदोबस्तासाठी असलेला कॉन्स्टेबल संतोष प्रभाकर जाधव, पावसामुळे पाय घसरून लोखंडी बॅरेकेटसवर पडला. त्याचा डावा पाय फॅक्चर असून, नागपाडा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गणेश विसर्जन करताना बुडून मृत्यूमालवणी मालाड परिसरातील मंगळवारी गणेश विसर्जनसाठी मढ जेठ्ठी येथे गेलेल्या रोहित चिन्नू शहा (वय १७, रा. सागर कुटीर सोसायटी, अंधेरी प.) बुडून मृत्यू झाला. रात्री ८च्या सुमारास ही घटना घडली असून, मृतदेह अद्याप मिळालेला नाही.

टॅग्स :मुंबईत पावसाचा हाहाकार