लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने शुक्रवारी दीड हजारांचा टप्पा गाठला आहे. तर मुंबईतील रुग्णंसख्याही हजारच्या पुढे गेली आहे. महामुंबईत अवघ्या २४ तासांत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात शुक्रवारी २१० रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने १ हजार ६१२चा टप्पा गाठला आहे. तर मुंबईची संख्याही १ हजार ८ झाली असून मागील २४ तासांत १३२ नवे रुग्ण सापडले आहेत. राज्यात शुक्रवारी १३ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली असून त्यामुळे राज्यातील मृत्यूसंख्या १११ झाली आहे. यात एकट्या मुंबईतील ६४ मृत्यूंचा समावेश आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३३ हजार ९३ नमुन्यांपैकी ३० हजार ४७७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १८८ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८ हजार ९२७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४ हजार ७३८ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात ४ हजार ३७४ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी आतापर्यंत साडेसोळा लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण केले.मृतांमध्ये ९ पुरुष आणि ४ महिलांचा समावेशराज्यात झालेल्या १३ मृत्यूंमध्ये मुंबईत १० तर पुणे, पनवेल आणि वसई-विरार येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यात नऊ पुरुष तर चार महिला आहेत. त्यापैकी सहा जण हे साठ वर्षांवरील आहेत, तर पाच रुग्ण हे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. दोघे जण ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्युमुखी पडलेल्या ११ रुग्णांमध्ये ८५ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आहेत.
खारघरमध्ये रिक्षाचालकाचा कोरोनामुळे मृत्यूपनवेल : पनवेलमध्ये कोरोना बाधीत रुग्णाचा पहिला बळी एक रिक्षाचालक ठरला आहे. बुधवारी या ३३ वर्षीय तरुणाची कोविड १९ टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. त्याच्यावर नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. या तरुणाला कोरोना सोबत डेंग्यूची लागण झाल्याने तो दगावल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे.