प्रदूषण करणारी सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या १२ भट्ट्या; 'सी' विभागात महापालिकेची कारवाई
By जयंत होवाळ | Published: March 1, 2024 07:00 PM2024-03-01T19:00:40+5:302024-03-01T19:00:54+5:30
काळबादेवीच्या नागरी वस्तीतील सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या बारा भट्ट्या आणि धुरांडी मुंबई महापालिकेने काढून टाकली.
मुंबई: काळबादेवीच्या नागरी वस्तीतील सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या बारा भट्ट्या आणि धुरांडी मुंबई महापालिकेने काढून टाकली. महानगरपालिकेच्या या व्यावसायिकांच्या कारखान्यात सोने-चांदी वितळवण्याचे काम होते. हे काम केले जात असताना निर्माण होणाऱ्या घातक वायूवर कोणतीही प्रक्रिया न करता तो वातावरणात सोडला जात होता. त्यामुळे भट्ट्या आणि धुरांडी काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली.
वायू प्रदूषण व धूळ नियंत्रणासाठी महानगरपालिकेकडून विविध प्रयत्न सुरु आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईही केली जात आहे. काळबादेवी भागात सोने -चांदी वितळवणारे अनेक कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये कोणत्याही नियमांचे पालन होत नाही. त्यांच्या भट्ट्यांमधून सोडल्या जाणाऱ्या घातक वायूमुळे आरोग्याच्या समस्या भेडसावत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अशा प्रकारची कार्यवाही कार्यवाही यापुढे देखील सुरू राहणार आहे, अशी माहिती 'सी' विभागाचे सहायक आयुक्त उद्धव चंदनशिवे यांनी दिली.
सोने-चांदी गलाई व्यवसायात सोने-चांदी वितळवण्यात येते. त्यासाठी छोटेखानी स्वरुपाचा कारखाना असतो. यामध्ये सोने-चांदी वितळवण्यासाठी भट्टीचा वापर केला जातो. त्यातून निर्माण होणारे आम्ल आणि वायू आदी चिमणी - धुराडे याद्वारे हवेत सोडले जातात. शास्त्रीय प्रक्रिया न करता सोडण्यात आलेल्या वायूमुळे मानवी आरोग्याला धोका पोहोचतो. या घातक वायूमुळे प्रदूषणात भर पडत असल्याने महानगरपालिकेने वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गलाई व्यावसायिकांविरोधात कारवाई केली.