निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या पोलिसाकडून १२ तास सेवा, मुलाने केली गृहविभागाकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 06:36 AM2020-07-07T06:36:34+5:302020-07-07T06:37:42+5:30
वडिलांची दोन्ही यकृत निकामी झाली आहेत. त्यात पेशी कमी आहेत. शिवाय वयोमानामुळे त्यांना एका डोळ्याने दिसत नाही. याबाबत पोलीस ठाण्याला माहिती असतानाही त्यांना बंदोबस्ताला लावणे चुकीचे आहे...
मुंबई : मुंबईतपोलिसांच्या कोरोनामुळे वाढत चाललेल्या मृत्यूसत्रामुळे ५५ वर्षांपुढील पोलिसांना घरी बसवले असतानाही कुर्ला पोलीस ठाण्यातील निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या पोलिसाकड़ून १२ तास सेवा करून घेतली. याच दरम्यान त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची बाधा झाल्याने, त्यांच्या मुलाने याबाबत गृहविभागाकडे तक्रार केली.
कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत संबंधित पोलीस हवालदार १० महिन्यांनी निवृत्त होणार आहेत. ते खारघर परिसरात पत्नी, मुलगा, सून आणि एक वर्षाच्या नातीसह राहतात. सुरुवातीला मे महिन्यात वडील घरीच होते. त्यानंतर जून महिन्यात त्यांना हजेरी लावण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. ते दुचाकीवरून खारघर ते कुर्ला प्रवास करत होते. याचदरम्यान १८ जूनपासून त्यांना १२ तास बंदोबस्त लावण्यात आला.
वडिलांची दोन्ही यकृत निकामी झाली आहेत. त्यात पेशी कमी आहेत. शिवाय वयोमानामुळे त्यांना एका डोळ्याने दिसत नाही. याबाबत पोलीस ठाण्याला माहिती असतानाही त्यांना बंदोबस्ताला लावणे चुकीचे आहे. याचदरम्यान २ जुलै रोजी त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यांना बीकेसी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापाठोपाठ घरातल्या अन्य चार सदस्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने त्यांना धक्का बसला. या प्रकारानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लेखी तक्रार केल्याचे सांगण्यात आले. मात्र या प्रकारानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साधी चौकशीही केली नसल्याचेही त्याने नमूद केले. याबाबत कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता, पोलीस आयुक्त कार्यालयाकड़ून पत्रक काढण्यात आल्याचे नमूद करत जास्त माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
हजेरी लावणे गरजेचे
शासनाच्या निर्णयामुळे ५५ वर्षांपुढील पोलिसांना आठवड्यातून एक दिवस तरी हजेरी लावणे गरजेचे आहे. त्यात मनुष्यबळ नसल्याने बºयाच ठिकाणी या पोलिसांना बंदोबस्ताला लावण्यात येत आहे. काही ठिकाणी केवळ हजेरी लावून, कार्यालयीन काम देण्यात येते, जेणेकरून त्यांना शासनाने जाहीर केलेल्या मदतीचा लाभ घेता येईल, असे एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने सांगितले