१२ लाखाचे बनावट पनीर व भेसळकारी पदार्थ जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारखान्यांवर धाड!
By स्नेहा मोरे | Published: August 27, 2022 12:06 PM2022-08-27T12:06:24+5:302022-08-27T12:06:46+5:30
आस्थापनेला अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत परवाना आढळून आला नाही. तरी आस्थापनेत विनापरवाना बनावट पनीर व तुपाचे विक्रीसाठी उत्पादन तयार करीत असल्याचे आढळले.
मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाने सणावाराच्या दृष्टीने भेसळयुक्त अन्न पदार्थांविषयी मोहिम सुरु केलेली असून त्याचाच भाग म्हणून दुध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, खाद्यतेल उत्पादक व रिपॅकर, घाऊक विक्रेते यांच्यावर प्रशासनामार्फत नाशिक जिल्ह्यात कारवाया करण्यात आलेल्या असून त्याचाच एक भाग म्हणून दिनांक २४/०८/२०२२ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. पाटील, अ. उ. रासकर, एस. के. पाटील यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मे मधुर डेअरी अँड डेलीनिडस्, अंबड, नाशिक या आस्थापनेवर धाड टाकण्यात आली.
आस्थापनेत अप्पासाहेब हरी घुले, वय ३९ वर्षे, नामक इसम नमूद आस्थापनेचा विक्रेता म्हणून हजर होता. आस्थापनेला अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत परवाना आढळून आला नाही. तरी आस्थापनेत विनापरवाना बनावट पनीर व तुपाचे विक्रीसाठी उत्पादन तयार करीत असल्याचे आढळले. हे पनीर रिफाइंड पामोलीन तेलाचा वापर करुन बनावटरित्या तयार करत असतांना आढळले. या कारखान्यात तयार झालेले पनीर व तूप हे अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मध्ये नमूद तरतुदीनुसार तयार केले जात नाहीत या संशयावरून विक्रेता घुले यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कोणताही वैध परवाना त्यांच्या उत्पादनाच्या जागेसाठी धारण केलेला नसल्यामुळे विक्रेता घुले यांच्याकडील पनीर, अॅसीटीक अॅसीड, रिफाइंड पामोलीन तेल, आणि तूप यांचा एकूण २,३५,७९६/- रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे आणि वैध परवाना धारण केल्या शिवाय अन्नव्यवसाय न करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
त्याचप्रमाणे दि. २४/०८/२०२२ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी डी. डी. तांबोळी, अ र. दाभाडे (गुप्तवार्ता) व गो. वि. कासार यांच्या पथकाने मे. आनंद डेअरी फार्म, म्हसरुळ, नाशिक या आस्थापनेवर धाडटाकली.. आस्थापनेत आनंद वर्मा, वय ५० वर्षे नामक व्यक्तीस विचारपुस केली असता विक्रीसाठी तयार केलेले पनीर हे बनावटया दुध पावडर व खाद्यतेलाचा वापर करून उत्पादीत केलेले असल्याचे सांगितले व त्याठिकाणी दुध पावडर, रिफाईंड पाम तेलाचा साठा उपलब्ध असल्याने सदरचे पनीरचा नमुना तसेच भेसळकारी पदार्थ यांचे नमुने घेऊन त्यांचा एकूण ९,६७,३१५/- रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
सदरचे दोन्ही कारखाने सिल करण्यात आलेले आहे. दोन्ही कारखान्यावर कारवाया अन्न सुरक्षा अधिकारी यांचे पथकाने, सहायक आयुक्त (अन्न) उ. सि. लोहकरे यांचे निर्देशानुसार नाशिक विभागाचे सह आयुक्त ग.सु. परळीकर, अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या मार्गदर्शनानुसार केलेली आहे.