ऐरोलीत ज्वेलर्सवर १२ लाखांचा दरोडा
By admin | Published: November 20, 2014 01:23 AM2014-11-20T01:23:18+5:302014-11-20T01:23:18+5:30
ऐरोली सेक्टर १७ येथील शिरोडकर ज्वेलर्सवर मंगळवारी मध्यरात्री दरोडा पडला. या प्रकारात दुकानातील १२ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.
नवी मुंबई : ऐरोली सेक्टर १७ येथील शिरोडकर ज्वेलर्सवर मंगळवारी मध्यरात्री दरोडा पडला. या प्रकारात दुकानातील १२ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. हा प्रकार दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्याद्वारे पोलीस तपास करीत आहेत.
रमेश शिरोडकर यांचे हे ज्वेलर्स दुकान असून दुकानालगतच त्यांचे घर आहे. मंगळवारी मध्यरात्री अज्ञात तिघांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश मिळवला. मात्र दुकानात झालेल्या आवाजामुळे दुकान मालक रमेश शिरोडकर यांना तेथील प्रकाराची माहिती मिळाली. त्यांनी सीसीटीव्हीला जोडलेला टीव्ही चालू केला असता दुकानात तिघे चोरी करत असल्याचे समजले. दरोडेखोर सशस्त्र असल्याने शिरोडकर यांनी चोरट्यांना विरोध करणे टाळले. सुमारे १० ते १५ मिनिटांत चोरट्यांनी दुकानातील १२ लाख १३ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरटे गेल्यानंतर शिरोडकर यांनी पोलिसांना कळवले.
तिघेही दरोडेखोर सॅन्ट्रो कारमधून तेथे आले होते. त्यांनी दुकानाच्या समोरच कार उभी केलेली होती. त्यानुसार दुकानातून लुटलेले सोन्याचे दागिने ट्रॉलीने कारमध्ये ठेवत असल्याचे कॅमेऱ्यात दिसत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या आरोपींचा शोध घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख गोजरे यांनी सांगितले. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)