Join us

रेल्वेत नोकरीला लावतो सांगून घेतले १२ लाख; एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 12:19 PM

पाच जणांवर गुन्हा, एकाला अटक

नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून तरुणाला १२ लाख ४० हजारांना फसवल्याप्रकरणी काशिमीरा पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एकास अटक झाली असून, चौघांचा शोध सुरू आहे. आरोपींनी गणवेशापासून तरुणास टीसीच्या बनावट नियुक्तीपत्रसुद्धा दिले होते. विशेष म्हणजे वैद्यकीय तपासणीसाठी रक्ताचे नमुनेही घेतले.

काशिमीराच्या मुन्शी कंपाउंडमध्ये राहणाऱ्या समीर कादरी याने कांदिवलीच्या पोईसर भागातील भरत नारायण झा (वय २८) याला थेट पद्धतीने रेल्वेत टीसीची नोकरी लावतो, असे २०१८ मध्ये सांगितले होते. त्यावेळी समीरने दीड लाख रुपये टोकन म्हणून घेतले. झा याला लखनौच्या रेल्वे मेडिकल सेंटर येथे बोलावून तेथील खान नावाच्या इसमाने वॉर्ड बॉयमार्फत रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले. मेडिकलमध्ये पास झाल्याने पुढील कार्यवाहीसाठी समीर याने आणखी २ लाख घेतले. 

बनावट नियुक्तीपत्र, गणवेशही दिला

झा याला उत्तर प्रदेश, दिल्ली येथे अनेक खेपा मारायला लावून रेल्वेच्या विविध कार्यालय परिसरात बोलावले. त्याला बनावट नियुक्तीपत्र, ओळखपत्र देण्यापासून टीसीचा गणवेशही दिला. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर झा याच्या फिर्यादीवरून काशिमीरा पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निखिल चव्हाण व पथकाने ठाण्याच्या कासारवडवलीतील असलेल्या समीर कादरी याला अटक केली. तो न्यायालयीन कोठडीत आहे, तर उर्वरित चार आरोपींचा शोध सुरु आहे. त्यानंतर रेल्वेत नोकरीसाठी विविध कारणांनी वेळोवेळी समीरसह खान, पांडे, सौरभ ऊर्फ मनोज यादव, धीरजकुमार सिंग यांनी एकूण १२ लाख ४० हजार उकळले.

टॅग्स :रेल्वेनोकरी