लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून दरवर्षी शेकडो विशेष गाड्या चालवण्यात येतात. मात्र,यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध जाहीर केले आहेत. त्याचा फटका रेल्वे प्रशासनाला बसला असून मध्य रेल्वेने राज्यांतर्गत १२ मेल, एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, विशेष रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने काही गाड्या रद्द केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)- गदग विशेष एक्सप्रेस १५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत रद्द केली आहे. गदग - सीएसएमटी विशेष एक्सप्रेस १६ एप्रिल ते १ मेपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
याचप्रमाणे पुणे - नागपूर विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या १५ एप्रिल ते २९ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तर नागपूर-पुणे विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या १६ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत रद्द राहतील. पुणे-अजनी विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या १७ एप्रिल ते १ मेपर्यंत रद्द राहतील. अजनी-पुणे विशेषच्या फेऱ्या १८ एप्रिल ते २ मेपर्यंत रद्द राहतील. नागपूर-पुणे विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या १७ एप्रिल ते १ मेपर्यंत, तर पुणे-नागपूर विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या १५ एप्रिल ते २९ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
* पुणे-अमरावती विशेष गाडी धावणार नाही
पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या २१ एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत रद्द राहतील. तर अमरावती-पुणे विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या २२ एप्रिल ते २९ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आलेल्या आहेत.
* नागपूर-अहमदाबाद गाड्या रद्द
नागपूर-अहमदाबाद विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या २१ एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत रद्द राहतील. अहमदाबाद-नागपूर विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या २२ एप्रिल ते २९ एप्रिलपर्यंत, तर पुणे-अजनी विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या २३ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
..........................