मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्र्यात १२ मिनिटांत; कोस्टल रोड-वांद्रे सी-लिंक मार्गाचे आज उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 05:48 AM2024-09-12T05:48:36+5:302024-09-12T05:49:18+5:30

मरीन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंत ६.२५ किमीचा मार्गही सुरू झाला आहे. तर आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा ४.५ किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी-लिंक जोडण्यात आला आहे.

12 minutes to Bandra directly from Marine Drive; Inauguration of Coastal Road-Bandra Sea-Link route today | मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्र्यात १२ मिनिटांत; कोस्टल रोड-वांद्रे सी-लिंक मार्गाचे आज उद्घाटन

मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्र्यात १२ मिनिटांत; कोस्टल रोड-वांद्रे सी-लिंक मार्गाचे आज उद्घाटन

मुंबई - पश्चिम उपनगरातील वाहतूक सुसाट होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी- लिंकला जोडण्याचे काम पूर्ण आहे. आजपासून या मार्गावरील प्रवास आता सुसाट होणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोड ते सी-लिंक मार्गाचे उद्घाटन होणार आहे.

बिंदू माधव चौकातून हिरवा कंदील दाखवल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल. या मार्गामुळे मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्र्यापर्यंत १२ मिनिटांत पोहोचता येणार आहे. या प्रकल्पामुळे ७० टक्के वेळ आणि ३४ टक्के इंधनाची बचत होईल. कोस्टल रोडचे १० टक्के काम पूर्ण झाले असून, हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक असा १०.५८ किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. मरीन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंत ६.२५ किमीचा मार्गही सुरू झाला आहे. तर आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा ४.५ किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी-लिंक जोडण्यात आला आहे.

कोंडी होणार कमी

या प्रकल्पामुळे लवकरच वाहनचालकांना मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्रयापर्यंत जाता येणार आहे. कोस्टल रोड सी-लिंकला वरळी येथे महाकाय गर्डरने जोडला गेल्याने वांद्रयाहून दक्षिण मुंबईत प्रवास करता येणार आहे. यामुळे येथील रोजची होणारी वाहतूक कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच मुंबईच्या दक्षिण टोकापासून वरळी सी- लिंकपर्यंत सिग्नलमुक्त वेगवान प्रवास करता येणार आहे.

महाकाय गर्डर जोडला

या प्रकल्पातील मुख्य टप्पा असलेला १३६ मीटरच्या पट्टा सर्वांत मोठ्या बो स्टिंग आर्च गर्डरने जोडण्यात आला आहे. दोन हजार मेट्रिक टन वजनाचा महाकाय गर्डर जोडण्यात आला आहे.

Web Title: 12 minutes to Bandra directly from Marine Drive; Inauguration of Coastal Road-Bandra Sea-Link route today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.