फणसवळेत आढळले डेंग्यूचे आणखी १२ रुग्ण
By admin | Published: December 9, 2014 11:40 PM2014-12-09T23:40:44+5:302014-12-09T23:54:07+5:30
रुग्णांची संख्या २० वर : आरोग्य विभागाची प्रयत्नांची शर्थ; विजय काळमपाटील यांची फणसवळेला भेट
रत्नागिरी : तालुक्यात फणसवळे गावातील कोंडवाडी व आंबेकरवाडीतील ताप व डेंग्यूची लागण नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्रयत्नांची शर्थ केली जात आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी आणखी १२ जणांना डेंग्यूची लागण झाली असल्याचे सोमवारी रात्री १० वाजता स्पष्ट झाले.
त्यामुळे फणसवळेत सापडलेल्या एकूण ६९ तापाच्या रुग्णांपैकी डेंग्यूचे २० रुग्ण निष्पन्न झाले आहेत. जिल्हा रुग्णालयात फणसवळेतील तापाचे नवीन ४ रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या फणसवळेतील रुग्णांची संख्या ३४ झाली आहे.
डेंग्यूमुळे फणसवळेत निर्माण झालेल्या स्थितीची पाहणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विजय काळमपाटील यांनी आज, मंगळवारी केली. त्यांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांची भेट घेऊन आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच उपकेंद्रात दाखल रुग्णांची विचारपूस केली. सरपंच गंगाराम घडशी यांनी २ डिसेंबरपासून ताप व डेंग्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांना आरोग्य विभागाने दिलेल्या उपचारांबाबत माहिती दिली. आरोग्य विभागाने योग्य खबरदारी घेत ताप व डेंग्यूला प्रतिबंध करण्याचे उपाय योजल्याचे लेखी पत्र सरपंच घडशी यांंनी काळमपाटील यांना दिले. यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली व विचारपूस केली. त्यांच्यासोबत आरोग्य सभापती अनिल शिगवण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र खंडागळे, जिल्हा हिवताप अधिकारी बी. जी. टोणपे, जिल्हा माध्यम अधिकारी श्रीकांत कुलकर्णी उपस्थित होते. गेल्या आठवडाभराच्या काळात फणसवळे कोंडवाडी व आंबेकरवाडी येथे ताप व डेंग्यूने थैमान घातले आहे. पहिल्या चार दिवसांत तापाचे म्हणून दाखल झालेल्या रुग्णांपैकी ८ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर प्रथम चार व नंतर उर्वरित चार रुग्णांना घरी जाऊ दिले. मात्र, रविवारी व सोमवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या तापाच्या रुग्णांचे रक्ताचे नमुने सोमवारी सायंकाळनंतर तपासले. (प्रतिनिधी)
डेंग्यूसाठी रक्ततपासणी सुविधा रत्नागिरीतच
रुग्णाला डेंग्यूची लागण झालीय का, याची तपासणी करण्याची व्यवस्था वर्षभरापूर्वी जिल्हा रुग्णालयात नव्हती. त्यामुळे रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवावे लागत होते. त्यामुळे विलंबाचा सामना करावा लागत होता. रुग्णांवर आवश्यक उपचार करण्यात त्यामुळे अडचणी येत होत्या. मात्र त्यानंतर ही सुविधा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मलेरिया विभागाच्या तंत्रज्ञांकडून रक्त तपासणी होऊन रुग्णास डेंग्यू आहे वा नाही हे येथेच निष्पन्न करणे शक्य
झाले आहे.