Join us

खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?

By यदू जोशी | Published: April 30, 2024 11:49 AM

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राज्यातील १३ पैकी १२ आमदारांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही.

यदु जोशी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राज्यातील १३ पैकी १२ आमदारांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. खासदारकीला हरल्यास त्यांची आमदारकी कायम राहील. अपवाद फक्त शरद पवार गटाचे निलेश लंके यांचा आहे. त्यांनी आमदारकीचा दिलेला राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला आहे.

वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर-भाजप) आणि रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे (औरंगाबाद-शिंदेसेना) हे दोन मंत्री निवडणूक लढत आहेत. सोलापूर आणि चंद्रपूर असे दोनच मतदारसंघ आहेत जिथे दोन्ही मुख्य प्रतिस्पर्धी विधानसभेचे सदस्य आहेत. त्यात सोलापुरात राम सातपुते (भाजप) आणि प्रणिती शिंदे (काँग्रेस), तर चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार (भाजप) आणि प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) यांचा समावेश असून, येथे मतदान झाले आहे.

नीलेश लंके हे राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटात गेले होते; पण त्यांनी या गटाचा राजीनामा दिला व ते शरद पवार गटामध्ये सामील झाले. त्याआधी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत ते पराभूत झाले तर कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतील.

राणे केंद्रात मंत्री; पण कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत

nनारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत; पण ते संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. राज्यसभा सदस्यत्वाचा त्यांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२४ रोजी संपलेला आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात ते भाजपचे उमेदवार आहेत. तिथे पराभूत झाले तर ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतील; मात्र जिंकले तर पुन्हा केंद्रात मंत्री होणार का? याबाबत उत्सुकता असेल.

nसातारामध्ये भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले हे भाजपचे राज्यसभा सदस्य असून त्यांचा कार्यकाळ २०२६ पर्यंत आहे. ते जिंकले तर लोकसभा सदस्यत्व कायम ठेवतील व राज्यसभेचा राजीनामा देतील, हे स्पष्ट आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी शशिकांत शिंदे हे विधानपरिषदेचे सदस्य आहेत आणि त्यांचा कार्यकाळ मे २०२६ पर्यंत आहे.

nकाँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता; पण ते लगेच राज्यसभेवर गेले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे राज्यसभेचे सदस्य असून उत्तर मुंबईत लढत आहेत.

१२ पैकी ११ विधानसभेतील

लोकसभा लढत असलेल्या १३ आमदारांपैकी नीलेश लंके यांनी राजीनामा दिला आहे. उर्वरित १२ पैकी ११ आमदार हे विधानसभेचे, तर शशिकांत शिंदे (शरद पवार गट - सातारा) हे विधानपरिषदेत आहेत. त्यांचा कार्यकाळ मे २०२६ पर्यंत म्हणजे आणखी दोन वर्षे आहे.

वर्षा गायकवाड (काँग्रेस - उत्तर-मध्य मुंबई), रवींद्र धंगेकर (काँग्रेस-पुणे), मिहिर कोटेचा (भाजप - उत्तर-पूर्व मुंबई), विकास ठाकरे (काँग्रेस - नागपूर), बळवंत वानखेडे (काँग्रेस - अमरावती), राजू पारवे (शिंदेसेना - रामटेक) हे विधानसभा सदस्य लोकसभेसाठी भाग्य आजमावत आहेत.

नियम काय सांगतो?

कायद्यानुसार कोणत्याही एकाच सभागृहाचे सदस्य राहता येते. आमदार लोकसभेवर निवडून गेल्यास दोनपैकी (लोकसभा वा विधानसभा) कोणत्या सभागृहाचे सदस्य म्हणून कायम राहायचे हे त्यांना लोकसभा अध्यक्ष व विधानसभा अध्यक्षांना निकालानंतर १४ दिवसांच्या आत कळवावे लागते.

दोनपैकी एका पदाचा राजीनामा द्यावा लागतो. लोकसभेची निवडणूक लढायची असेल तर राज्यसभा, विधानपरिषद वा विधानसभा सदस्यत्वाचा आधी राजीनामा द्यावा लागतो असा कोणताही नियम नाही.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४निवडणूकमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणुक रणांगण २०२४