लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ब्रिटनमधून २५ नोव्हेंबर, २०२० नंतर मुंबईत आलेले, तसेच २१ डिसेंबरपासून हॉटेलमध्ये क्वारंटाइन असलेले १२ प्रवासी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. या रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत.
इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळल्यामुळे २१ डिसेंबर, २०२० पासून मुंबईत येणाऱ्या सर्व प्रवाशांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे, तसेच महिनाभराच्या कालावधीत मुंबईत आलेल्या १,५८३ परदेशी प्रवाशांचीही तपासणी सुरू आहे. अशा आठशे प्रवाशांची चाचणी महापालिकेने केली आहे. यापैकी १२ प्रवाशांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांनी दिली.
* ६५० प्रवशांचा शोध लागेना
ब्रिटनवरून आलेल्या प्रवाशांचे नाव, घराचा पत्ता व संपर्क क्रमांकाची यादी महापालिकेने मुंबई विमानतळाकडून घेतली होती. मात्र, यापैकी तब्बल ६५० प्रवाशांचा शोध महापालिकेच्या पथकाला लागलेला नाही. कोणाचा फोन बंद, तर कोणाच्या घराला टाळे आहे. त्यामुळे या प्रवाशांची यादी पुन्हा एकदा मुंबई विमानतळाकडून महापालिकेने मागविली आहे.
.....................