लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून(एमआरव्हीसी) विरार-डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्पाचे काम विरार स्थानकात करण्यात येत आहे. या कामाचा फटका विरार ते डहाणू रोड दरम्यान राहणाऱ्या रेल्वे प्रवाशांना बसला आहे. प्रकल्पाच्या कामाकरीता केलेल्या खोदकामामुळे विरार स्थानकातील उत्तरेकडील १२ सिग्नल बंद झाले आहेत. सध्या दुरुस्ती काम सुरू असून विरार ते डहाणू रोड दरम्यान लोकल फेऱ्या अतिशय धीम्या गतीने सुरू आहेत. बारा सिग्नल बंद झाल्याने १० मेल आणि २० लोकल फेऱयांवर परिणाम झाला आहे. या गाडया १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत.
एमयूटीपी ३ प्रकल्पसंचातंर्गत पश्चिम रेल्वेवरील विरार-डहाणू रोड चौपदरीकरणासाठी एकूण ६४ किमीची मार्गिका उभारण्यात येत आहे. यासाठी विरार स्थानकातील फलाट क्रमांक २ आणि ३ वर डेक उभारण्यात येत आहे. डेकच्या खांबाचा पाया उभारण्यासाठी शुक्रवारी खोदकाम सुरू होते. खोदकाम करताना सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास १२ सिग्नल केबल बाधित झाल्या. परिणामी १२ सिग्नल बंद झाले आहेत.
ऐन गर्दीच्या वेळी १२ सिग्नल बंद पडल्याने विरार ते डहाणू रोड दरम्यान रेल्वे वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान लोकल सुरळीत सुरू आहेत. एमआरव्हीसी आणि पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून ३० कर्मचारयांकडून कामे सुरू आहेत. या गोंधळामुळे विरार स्थानकात मोठी गर्दी उसळली आहे.
एमआरव्हीसी प्रकल्पाच्या कामामुळे १२ सिग्नल बंद झाले होते. सध्या दोन सिग्नल यंत्रणा पूर्ववत करण्यात आले आहे. शक्य तितक्या लवकर उर्वरित सिग्नल सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. -सुमित ठाकूर,मुख्य जनसंपर्क अधिकारी,पश्चिम रेल्वे