राज्यात काेराेनाचे १२ हजार सक्रिय रुग्ण; विविध व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 06:48 AM2022-08-08T06:48:41+5:302022-08-08T06:48:49+5:30
दिवसभरात १६७५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
मुंबई : केंद्राने राज्याला कोरोना अलर्ट दिला असताना यंत्रणा पुन्हा सतर्क झाल्या आहेत. येत्या काळात दैनंदिन चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात येईल, तसेच लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग करत आहे. राज्यात रविवारी १८१२ रुग्णांचे निदान झाले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १२ हजार ११ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
दिवसभरात १६७५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ७८,९९,५८२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०१% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.८३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,३४,३६,१३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ०९.६६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,५९,७३२ झाली असून मृतांचा आकडा एक लाख ४८ हजार १३९ इतका आहे.
विविध व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ कायम
पुणे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय यांच्या अहवालानुसार राज्यात बी ए.४ चा १ आणि बीए.५ चे २ तर बीए.२.७५ व्हेरियंटचे १६ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत. पुणे इन्साकॉग प्रयोगशाळांमध्ये यांची तपासणी झाली आहे. या सर्व रुग्णांचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या २७५ तर बीए. २.७५ रुग्णांची संख्या २५०
झाली आहे.