आलिशान घर आवडे सर्वांना!; सहा महिन्यांतच मुंबईत १२ हजार कोटींच्या घरांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 06:54 AM2024-07-12T06:54:35+5:302024-07-12T06:55:08+5:30
एकीकडे मुंबईत दहा बाय दहाच्या खोलीसाठी लाखो रुपये मोजावे लागत असताना आलिशान घरांचीही निर्मिती या शहरात होते.
मुंबई : आंतरराष्ट्रीय शहर, देशाची आर्थिक राजधानी, स्वप्नांचे महानगर अशी विशेषणे ज्या शहराच्या मागेपुढे लावली जातात, त्या मायानगरी मुंबईत स्वत:चे हक्काचे घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी जो तो यथाशक्ती प्रयत्न करत असतो. एकीकडे मुंबईत दहा बाय दहाच्या खोलीसाठी लाखो रुपये मोजावे लागत असताना आलिशान घरांचीही निर्मिती या शहरात होते.
अशाच आलिशान घरांच्या विक्रीने यंदा पहिल्या सहा महिन्यांतच नवा विक्रम स्थापित केला आहे.
तब्बल १२ हजार ३०० कोटी रुपये किमतीची आलिशान घरे जानेवारी ते जून या कालावधीत विकली गेली आहेत.
गेल्या वर्षी याच कालावधीत ११ हजार ४०० कोटी रुपये किमतीच्या घरांची विक्री झाली होती.
आलिशान घरांच्या विक्रीमध्ये दक्षिण मुंबईत ३७ % घरांची विक्री
बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षण कंपनीच्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती पुढे आली आहे. आलिशान घरांच्या विक्रीमध्ये दक्षिण मुंबईने आपला वरचष्मा कायम राखला असून गेल्या सहा महिन्यांत झालेल्या आलिशान घरांच्या विक्रीमध्ये एकट्या दक्षिण मुंबईत ३७ टक्के घरांची विक्री झाली आहे. १२ हजार ३०० कोटी रुपयांपैकी साडेतीन हजार कोटी रुपयांची घरे ही रिसेलमधील आहेत; तर उर्वरित घरे ही नव्याने खरेदी करण्यात आली आहेत.
आलिशान घर म्हणजे?
ज्या घरांची किंमत दहा कोटींहून अधिक असते, ती घरे आलिशान समजली जातात.
या घरांचे किमान आकारमान दोन हजार चौरस फूट आणि त्याहून अधिक असते.
कोणत्या ठिकाणांना पसंती?
वरळी, लोअर परळ, प्रभादेवी वांद्रे, जुहू, ओशिवरा, अंधेरी आणि गोरेगाव.
उपनगरांत सर्वाधिक ८८१ कोटी रुपयांचे व्यवहार हे गोरेगाव येथे झाले आहेत.