मुंबईतील पायाभुत सुविधा प्रकल्पांकरीता १२ हजार ९६९.३५ कोटी, एमएमआरडीएची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 07:06 PM2021-02-23T19:06:17+5:302021-02-23T19:07:03+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १५० वी बैठक आज संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये रू. १२,९६९.३५ कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १५० वी बैठक आज संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये रू. १२,९६९.३५ कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता मिळाली असून त्यामध्ये सार्वजनिक वाहतूक – मेट्रो प्रकल्प आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होईल व मुंबईकारांचा प्रवास अधिक आरामदायी व कमी वेळेत होणे शक्य होणार आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ (मेट्रो मार्ग-३) प्रकल्पाकरीता प्राधिकरणातर्फे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) करीता २५० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. येत्या वर्षात मेट्रो मार्ग-२अ (दहिसर-डी.एन.नगर (अंधेरी)) व मेट्रो मार्ग-७ (दहिसर (पूर्व) – अंधेरी (पूर्व)) या मार्गिकांवर वर प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता असल्याने सदर प्रकल्पांकरीता अनुक्रमे ७००.६५ कोटी व ९९९.४५ कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच मेट्रो रेल प्रकल्पांसाठी अर्थकसंकल्पामध्ये ४५७१.२५ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे मेट्रो भवन, मेट्रो कर्मचारी निवासस्थानेकरीता ३२९.३० कोटी, मोनोरेल प्रकल्पाकरीता १२०.२० कोटी, मुंबई पारबंदर छन्न् मार्ग २९००.३५ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.
बाळासाहेब ठाकरे स्मारककारीता १०० कोटी, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाकरीता २६० कोटी, वांद्रे-कुर्ला संकुल (कलानगर उड्डाणपुलासह) ६० कोटी, मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पांकरीता (MUTP) ४०५ कोटी, एमयुआयपी (विस्तारित) प्रकल्पाकरीता ७७६.८५ कोटी, मेट्रो स्थानकांसाठी नियोजन व बहुवाहतुक आराखड्याकरीता ३०० कोटी, प्रादेशिक स्तरावर जलस्त्रोताचा विकास प्रकल्पाकरीता ६१३.३५ कोटी, सांताक्रुझ-चेंबुर-जोडरस्ता विस्तारित प्रकल्पाकरीता २०० कोटी, छेडानगर जंक्शन येथे उन्नतमार्ग सुधारणा प्रकल्पाकरीता ६० कोटी, पूर्व/पश्चिम द्रुतगती मार्गाच्या देखभाल व दुरूस्तीकरीता २०० कोटी, सिटीपार्क ते महाराष्ट्र निसर्ग उद्यान पादचारी झुलता पूल प्रकल्पाकरीता ७७.०५ कोटी तसेच इतर प्रकल्पांकरीता ९८३.३५ कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच सर्वेक्षण व अनुदाने याकरीता १७५.३५ ,कर्ज वितरण व सुरक्षा ठेवीकरीता २७३, प्रशासकीय भांडवली खर्चाकरीता ५४८.६० कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. सन २०२१-२२ या अर्थसंकल्पीय वर्षात १२९६९.३५ कोटी इतका खर्च अपेक्षित असून ९८३३.७५ कोटी इतकी रक्कम जमा होणे अपेक्षित आहे.
प्राधिकरणाने सन 2019-20 च्या वार्षिक अहवालास मान्यता दिलेली असून मेट्रो मार्ग-2ब (ङिएन.नगर ते मंडाळे) येथील विस्तारीकरणास व स्थानक बदलास तसेच मेट्रो मार्ग-7 (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) येथील स्थानक बदलास मंजूरी देण्यात आली. तसेच पूर्व द्रुतगती महामार्गाच्या पृष्ठभागाच्या कामकाजाकरीता आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कामकाजांकरीता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यास प्राधिकरणाने मंजुरी दिली.