Join us

खूशखबर! पोलिसांची आणखी १२ हजार पदे भरणार, पोलीस क्रीडा अकादमी उभारण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 12:59 PM

पोलीस ठाण्यांची संख्या वाढविण्याबरोबरच पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

मुंबई - २०२० मधील ७२३१ पदांसाठी पोलीस महासंचालकांकडून भरती प्रक्रिया सुरू असून आणखी  १२ हजार पोलिसांची भरती करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत सोमवारी दिले. 

राज्यात २०१९ मधील ५२९७ पोलीस शिपाईपदांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन प्रशिक्षण सुरू आहे. पोलीस ठाण्यांची संख्या वाढविण्याबरोबरच पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. पोलिसांसाठी क्रीडा अकादमी उभारण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णयही बैठकीत झाला.

नवीन पोलीस ठाण्यांच्या उभारणीसाठी सर्वंकष आराखडा तयार करा, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अपराधसिद्धतेचा दर वाढविण्यासाठी नियोजन करा, पोलीस दलासाठीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावेत. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्रलंबित असलेली परवानगीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांना सूचना देऊन याबाबत उचित कार्यवाही करावी, असे निर्देश फडणवीस यांनी या बैठकीत दिले.

बैठकीत हे झाले निर्णय

मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा  प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करणार. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये एक महिन्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावणार. सागरी सुरक्षेसाठी नवीन बोटी खरेदी करणार.सायबर सुरक्षा  प्रकल्पासाठी सल्लागार नेमणार.अमली पदार्थविरोधी कायद्यात सुधारणा करण्यासाठी अभ्यास करणार. पोलीस दलाचे श्वान पथक अत्याधुनिक करणार. सामाजिक, राजकीय आंदोलनातील तसेच धार्मिक उत्सवातील खटले मागे घेण्यास गती देणार. नवीन कारागृहांची उभारणी करणार. जामीन मंजूर असलेल्या १६४१ बंदींना कारागृहातून सोडण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करणार.

मंत्रालयाची सुरक्षा कडक करणार

मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेचे बळकटीकरण करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. मंत्रालयात अनुचित घटना घडू नये म्हणून उपाययोजना करण्यासही त्यांनी सांगितले.

फेक माथाडी, वसुली सम्राटांना चाप लावणार 

राज्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी फेक माथाडी चळवळ फोफावत आहे. यामुळे माथाडी चळवळ बदनाम होत आहे. या फेक माथाडी तथा वसुली सम्राटांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला त्यांनी दिले. 

टॅग्स :पोलिसमहाराष्ट्र