मुंबईतील रस्त्यांवर दोन महिन्यांत १२ हजार खड्डे! ९ दुय्यम इंजिनीअर्सना महापालिकेने बजावल्या नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 10:11 AM2024-08-03T10:11:26+5:302024-08-03T10:11:43+5:30
याआधी प्रशासनाने १३ इंजिनिअर्सना नोटिसा बजावल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून १ ऑगस्टपर्यंत म्हणजेच गेल्या दोन महिन्यांत मुंबईत खड्ड्यांचा महापूर आला. या कालावधीत तब्बल १२ हजार ७६१ खड्डे मुंबईत आढळून आले. त्यातील १२ हजार ५३३ खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे; मात्र खड्डे भरण्याच्या कार्यवाहीकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून मुंबई महापालिकेने नऊ दुय्यम अभियंत्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. याआधी प्रशासनाने १३ इंजिनिअर्सना नोटिसा बजावल्या होत्या.
१ जून २०२४ ते १ ऑगस्ट २०२४ दरम्यान मुंबई शहर व उपनगरात तब्बल १२ हजार ७६१ खड्डे निदर्शनास आले. मास्टिक कुकर संयंत्रांची संख्या २५ होती ती वाढवून खड्ड्यांचे काम जलदगतीने करण्यासाठी ३५ करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. पावसाने उसंत घेतल्याने खड्डे बुजविण्यासाठी ही योग्य वेळ असून, यामध्ये मास्टिक व्यवस्थित भरले जाते. विशेषतः सोमवार ते शुक्रवारच्या काळात खड्डे भरण्याचे काम वाहतुकीला अडथळे येऊ नयेत म्हणून दिवसा हाती घेतले जाते. तर शनिवारी, रविवारी वर्दळ कमी असल्याने दिवसा काम करता येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
खड्ड्यांच्या संख्येत वाढ
मुसळधार पावसामुळे खड्ड्यांच्या संख्येत वाढ झाली. खड्ड्यांपैकी २ ऑगस्टपर्यंत १२ हजार ५३३ खड्डे पालिकेकडून मास्टिक कुकर संयंत्राच्या मदतीने बुजविण्यात आल्याचे पालिकेने सांगितले. मास्टिक कुकर संयंत्रावर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित केली. याच्या साहाय्याने १८० चौ. फुटांपर्यंतचा खड्डा बुजवला जाऊ शकतो.
खड्डा दिसल्यास तक्रार करा
- मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी नागरी मदत सेवा क्रमांक १९१६, समाजमाध्यमे, व्हॉट्सॲप चॅटबॉट, पॉटहोल फिक्सिंग ॲप्लिकेशन तसेच दुय्यम अभियंत्यांचे मोबाइल क्रमांक इत्यादी विविध पर्याय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
- या सर्व माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तसेच विभागनिहाय शोधण्यात आलेल्या खड्डे बुजवण्याची कार्यवाही शक्यतो २४ तासांत पूर्ण करण्यात यावी.
- तसेच यासाठी २२७ दुय्यम अभियंत्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात रस्त्यांवर उतरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, २४ तासांत खड्डे न भरल्याने कार्यवाहीला उशीर झाल्याने ९ दुय्यम अभियंत्यांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.