मुंबई :
Maharashtra Dengue Cases: राज्यात गेल्या नऊ महिन्यांत डेंग्यूने ३१ जणांचा बळी घेतला आहे. हा आजार १३ हजार ५९४ रुग्णांना झाला. हा आजार डासांमुळे होणारा असून, आपल्या आजूबाजूच्या परिसरात डासांची उत्पत्तीस्थळे असतील तर ती नष्ट केली पाहिजेत, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. विशेष म्हणजे, राज्याच्या रुग्णांच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक ३४३५ रुग्ण आणि १२ मृत्यू हे एकट्या मुंबईतील आहेत.
या आजाराच्या जनजगृतीसाठी मुंबईत ‘भाग मच्छर भाग’ जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. डासांची उत्पत्तीस्थळे वेळीच नष्ट केली, तर डेंग्यू व हिवताप आजारावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, असा संदेश मोहिमेच्या माध्यमातून दिला आहे. अंगदुखी, थंडी, ताप, खोकला आणि सर्दी अशी सर्वसामान्य लक्षणे या आजारामध्ये दिसतात. टायर, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकच्या बाटल्या व बाटल्यांची झाकणे, कुंड्या व त्या कुंड्याखालील तबकडी, फ्रीजच्या खालील डिफ्रॉस्ट ट्रे यामध्ये पाणी साचून राहणार नाही, याची दररोज पाहणी करावी व दक्षता घ्यावी. फेंगशुई, मनी प्लांटसारख्या शोभेच्या रोपट्यांचे पाणी नियमितपणे बदलावे. दिवसा आणि रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधात्मक औषधींचा वापर करावा. जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या यासारख्या वस्तू जमा करणे टाळावे. अडगळीत पाणी साचून डासांची उत्पत्ती होते.
हिवताप, डेंग्यू प्रतिबंधासाठी उपाययोजनानागरिकांनी घरामध्ये, घराच्या आजूबाजूला व इमारतींच्या परिसरात कुठेही पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. साचलेल्या पाण्यातच डासांची मादी अंडी घालते व डासांची उत्पत्तीस्थळे तयार होतात. साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.