मुंबई - खेरवाडी परिसरात बारा वर्षीय मुलाचा त्याच्या राहत्या घरी मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार मंगळवारी ( 26 सप्टेंबर ) सकाळी उघडकीस आला. अजय जयस्वाल असे मृत पावलेल्या मुलाचं नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे.
अजय जयस्वाल हा आई-वडील आणि मोठ्या भावासह खेरवाडीच्या ज्ञानेश्वरनगर झोपडपट्टीत राहत होता. त्याचे वडील इलेक्ट्रीशियनचे काम करतात. काही दिवसांपूर्वी त्याचे आई-वडील आणि मोठा भाऊ काही कामास्तव गावी गेले होते. मंगळवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास त्याचे वडील घरी आले आणि त्यांनी बंद असलेला दरवाजा ठोठावला. मात्र घरातून अजयनं काहीच प्रतिसाद दिला नाही. तेव्हा त्यांनी आजूबाजूच्या परिसरात अजयबाबत विचारपूस केली. मात्र तो कुठे गेलाय हे कुणालाच माहीत नव्हते. अखेर त्यांनी हतोडीच्या सहाय्याने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.
तेव्हा त्यांना अजय रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला दिसला. यावेळी त्यांनी शेजाऱ्यांना बोलावले आणि पोलिसांनाही फोन केला. खेरवाडी पोलीस घटनास्थळी धाव घेत अजयला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. खेरवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी 'लोकमत'ला दिलेल्या माहितीनुसार, अजय जयस्वालचा सुरुवातीला गळा दाबून आणि त्यानंतर धारदार शस्त्रानं त्याच्या डोक्यावर प्रहार करुन त्याची हत्या करण्यात आली. दरम्यान, अजयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्याच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रीय सुरू असल्याची माहितीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली आहे.