Join us

अपहरणकर्त्यांच्या तावडीतून १२ वर्षीय चिमुरडा निसटला

By admin | Published: April 24, 2015 3:21 AM

मित्राला भेटण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय चिमुरड्याचे तिघांनी अपहरण केल्याची घटना मंगळवारी चेंबूरच्या वाशी नाका परिसरात घडली. पोलीस या मुलाचा शोध घेत असतानाच आज

समीर कर्णुक, मुंबईमित्राला भेटण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय चिमुरड्याचे तिघांनी अपहरण केल्याची घटना मंगळवारी चेंबूरच्या वाशी नाका परिसरात घडली. पोलीस या मुलाचा शोध घेत असतानाच आज पहाटे या मुलाने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळ काढत घर गाठले. त्याच्या या शौर्याची कुटुंबीयांसह पोलिसांनीदेखील प्रशंसा केली आहे. पोलीस आता अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत.शुभम् वडमारे हा रायन इंटरनॅशनल हायस्कूलमध्ये सहावीत शिकतो. मूळचा पनवेल येथे राहणारा शुभम् चेंबूरच्या वाशी नाका परिसरात त्याच्या आजीजवळ राहतो. मंगळवारी शाळा सुटल्यानंतर तो घरी आला. त्यानंतर जेवण आटोपून मित्राकडे जाऊन येतो, असे सांगत तो घराबाहेर पडला. मात्र सायंकाळ झाल्यानंतरही न परतल्याने आजीने आणि मामाने त्याचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत तो कुठेच न आढळल्याने त्यांनी आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.मात्र २४ तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांना काहीही सुगावा लागला नाही. आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक हा मुलगा त्याच्या पनवेल येथील घरी पोहोचला. दोन दिवस जेवण, झोप नसल्याने त्याची प्रकृती कमालीची खालावली होती. त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्याकडे काहीही चौकशी न करता त्याला खाऊ-पिऊ घातले. त्यानंतर चौकशी केली असता, एका महिलेने आणि दोन इसमांनी आपले अपहरण केल्याचे त्याने कुटुंबीयांना सांगितले. मंगळवारी मित्राच्या घरी जात असताना एका महिलेने त्याला बोलावून एका निर्जन ठिकाणी नेले. तेथे दोन इसम उभे होते. त्यांनी चाकूचा धाक दाखवत रिक्षातून चेंबूर रेल्वे स्थानकात नेले. त्यानंतर एका झोपडपट्टीत नेऊन आपल्याला एका खोलीत दोन दिवस डांबून ठेवल्याचे या मुलाने सांगितले. दोन दिवस खोलीत त्याच्यासोबत दोन्ही आरोपीही झोपले होते. गुरुवारी पहाटे दोघेही बाहेर गेले. तेव्हा या मुलाने दरवाजा ठोकला असता बाहेरून कोणीतरी दरवाजाची कडी काढली. हीच संधी साधत या मुलाने पळ काढला. पुढे एका रिक्षावाल्याला गाठून त्याने घडलेला प्रकार सांगत रेल्वे स्थानकात सोडण्यास सांगितले. त्यानुसार रिक्षाचालकाने त्याला मानसरोवर रेल्वे स्थानकात सोडले. तिथून ट्रेन पकडून त्याने पनवेलमधील घर गाठले.