१२ वर्षात प्रशासन आजिबात हललेले नाही - नितीन सरदेसाई, मनसे माजी आमदार
By अोंकार करंबेळकर | Published: August 30, 2017 02:28 PM2017-08-30T14:28:21+5:302017-08-30T19:55:54+5:30
मी २००५ चा पूर अनुभवला आणि कालचीही स्थिती पाहिली. दोन्ही वेळेचा विचार केला तर मुंबई पालिकेने आणि प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसले नाही
मुंबई, दि. 30 - मी २००५ चा पूर अनुभवला आणि कालचीही स्थिती पाहिली. दोन्ही वेळेचा विचार केला तर मुंबई पालिकेने आणि प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसले नाही. प्रशासन दरवर्षी नालेसफाई झाली म्हणून जाहीर करत पण ती प्रत्यक्षात झालेली नसते याचे पुरावे माध्यमेच प्रसिद्ध करतात आणि आपणही ते उघड्या डोळ्यांनी पाहतोच. काल साचलेले पाणी काढण्यास सहा पंप लावले आहेत असे महापौर सांगत होते, जर मुंबईत पाऊस मोठा पडतो हे माहिती आहे, तर त्या पंपांची संख्या का वाढवता येत नाही, शहराचा जरा पुढच्या काळातील, आपत्ती काळसाठी म्हणून वेगळा विचार का केला जात नाही ही आश्चर्याची बाब आहे. नालेसफाई, नाल्यांचे रुंदीकरण होत नाही, रेल्वेरुळांवर पाणी साचते यामागे ठेकेदार व प्रशासनाचे साटेलोटे आहे यात शंकाच नाही. पालिकेच्या प्रचंड ठेवींचा वापर पायाभूत सुविधा, आपत्ती व्यवस्थापनासाठी वापरल्या गेल्या पाहिजेत. या ठेवी साठवून ठेवण्यापेक्षा पंपांची संख्या वाढवणे, नालेसफाई केली पाहिजे. जर पावसाची तीव्रता तुमच्या व्यवस्थेपेक्षा जास्त असे असेल तर तशी तयारी करण्याची गरज आहे. पंपांची संख्या वाढवणे, जास्त क्षमतेचे पंप बसवणे हे सगळं करावे लागेल. वाईट याचं वाटतं की हे सगळं आपत्ती आल्यावर प्रशासन करतं, त्यांनी हे संकट येण्यापुर्वीच तयारी करुन त्याचा तडाखा कमी बसेल याची काळजी घ्यायला हवी होती. काल चक्क केईएम सारख्या महत्वाच्या आणि सर्वाधिक गर्दीच्या रुग्णालयात पाणी घुसले होते त्यामुळे पालिका प्रशासन आणि सत्ताधारी किती गाफिल होते याचीच प्रचिती सर्वांना आली
कालच्या पावसाबाबत हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला असला तरी त्या अंदाजाकडे लोक गांभिर्याने का पाहत नाहीत याचाही विचार केला पाहिजे . कारण बहुतांशवेळेस ते योग्य ठरत नाहीत. तसेच ते योग्यवेळ हाताशी ठेवून दिले जात नाहीत हवामान अंदाज, प्रशासन यांच्यातही ताळमेळ हवा. जेव्हा लक्षावधी लोक एका शहरात प्रवास करत असतात तेव्हा त्यांना योग्य अंदाज, योग्यवेळेय मिळायला हवा, काल आपल्याकडे पाऊस सुरु झाल्यावर लोकांना घराबाहेर पडू नका असे सांगण्यात येऊ लागलं होतं. ही फारच तोकडी व्यवस्था आहे आणि प्रशासनाचे ढळढळीत अपयश आहे.