मुंबई: मुंबईची लाईफलाईन असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाने मुंबई हादरून गेली होती आणि एकच हाहाकार माजला होता. या दुर्दैवी घटनेला म्हणजेच या काळ्या दिवसाला आज १२ वर्षं पूर्ण होत आहेत. मुंबईच काय तर देश हादरवून टाकणाऱ्या या साखळी बॉम्बस्फोटात १८८ निष्पाप लोकांचा नाहक जीव गेला, तर ८२९ जण जखमी झाले होते. त्यानंतर ११ जुलै २००६चा वाराणसी स्फोट, २६ जुलै २००८ ला झालेले अहमदाबादमधील स्फोट व २५ ऑगस्ट २००७ रोजी हैदराबादमध्ये झालेले दुहेरी स्फोट, १ ऑगस्ट २०१२ रोजी जंगली महाराज रोडवर झालेले स्फोट, १३ सप्टेंबर २००८ पाच बॉम्बस्फोटांनी हादरलेली दिल्ली तर मुंबईत झालेला १३ जुलै २०११ चा तिहेरी बॉम्बस्फोट पाहता हे सर्व बॉम्बस्फोट पावसाळ्यातच झाले होते.
दहशतवादी कारवायांना पावसाळ्यात का येते उधाण ?भारतात हाहाकार माजवणारे बॉम्बस्फोट आपण जर पाहिले तर ते जास्तीत जास्त पावसाळ्यातच झालेले आढळून येतील. दहशतवादी कारवायांना पावसाळ्यात इतका जोर येतो. कारण पावसाळ्यात नागरिकांची तर घाई गडबड असतेच. तसेच पोलिसांची सुद्धा गाळण उडालेली असते. दहशतवादी हे बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी एखाद्या ठिकाणाची काही महिने आधीच त्या ठिकाणाची रेकी करतात. नंतर गुप्तपणे बॉम्ब बनवून तो वर्दळीच्याच ठिकाणी ठेवतात. जेणेकरून जास्तीत जास्त जीवितहानी व्हावी. पावसाळ्यात पुरावे नष्ट करणे आरोपींना सहज सोपं असतं आणि पावसाळ्यात तारांबळ उडालेल्या नागरिकांपैकी साक्षीदार मिळणं देखील अवघड असतं असे महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख असलेले अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच पुढे ते म्हणाले पावसाचा फायदा घेत दहशतवादी बॉम्बस्फोट घडवून आणतात. मात्र, सध्या एटीएस हे प्रभावीपणे कार्यरत असल्याने आम्ही पावसाळ्यात देखील सक्षमपणे दहशदवादाला विरोध करण्यासाठी सज्ज आहे.
मुंबईतील लोकलमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी मोक्का कोर्टाने १३ पैकी १२ आरोपींना दोषी ठरवलं आहे. या बॉम्बस्फोटाच्या घटनाक्रमावर एक दृष्टीक्षेप...
रेल्वे बॉम्बस्फोट ११ जुलै २००६...संध्याकाळची वेळ...पश्चिम रेल्वेमार्गावर लोकलमध्ये ११ मिनिटात ७ बॉम्बस्फोटलोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्ब्यात झालेल्या स्फोटात १८७ प्रवाशांचा मृत्यू, ८१७ जण जखमी संध्याकाळी ६.२३ वाजता पहिला बॉम्बस्फोट झाला. ६.३४ पर्यंत सात बॉम्बस्फोट झाले. खार रोड, वांद्रे, जोगेश्वरी, माहीम, बोरिवली, माटुंगा जंक्शन आणि मिरा-रोड स्थानकात स्फोट झाल्याने खळबळ माजली.जून २००७ मध्ये मोक्का कोर्टात खटल्याला सुरुवात झाली.प्रत्यक्षदर्शींचे तब्बल साडेपाच हजार पानांचे जबाब नोंदवले.
या प्रकरणात एकूण १३ आरोपी होते. मोहम्मद फैजल, आसिफ खान बशीर खान, मोहम्मद साजीद अन्सारी, एहतशाम सिद्दीकी, डॉक्टर तनवीर अन्सारी, शेख मोहम्मद अली, मोहम्मद अब्दुल वाहिद्दीन, नावेद रशीद खान, मोहम्मद माजीद अन्सारी, कमाल अन्सारी, मुजम्मिल अता - उर - रहमान शेख, सुहैल महमूद शेख, जमीर अहमद शेख यांना दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली होती.
रेल्वे बॉम्बस्फोटांमागे पाकिस्तानची आयएसआय आणि लष्कर - ए- तैयबा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा दावा दहशतवाद विरोधी पथकाने केला होता.
या प्रकरणातील अन्य १३ आरोपींसह आजम चीमा हा फरार आहे.