दर्यादील... टाटा रुग्णालयाला १२० कोटींची जागा दान; लवकरच होणार विस्तार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 07:21 AM2021-09-06T07:21:10+5:302021-09-06T07:24:28+5:30
मुंबईतील एका दानशूर महिलेने तिच्या मालकीची सुमारे १२० कोटी रुपये किंमतीच जमीन टाटा रुग्णालयाला केमोथेरपी केंद्र सुरू करण्यासाठी दिली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कर्करुग्णांवर उपचार करणारे टाटा मेमोरियल रुग्णालय हे देशातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. येथे उपचार घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांची यादी मोठी असल्याने अनेकांना वाट पहात थांबावे लागते. त्यावर उपाय म्हणून मुंबईतील एका दानशूर महिलेने तिच्या मालकीची सुमारे १२० कोटी रुपये किंमतीची जमीन टाटा रुग्णालयाला केमोथेरपी केंद्र सुरू करण्यासाठी दिली आहे तर आणखी १८ दानशूर व्यक्तींनी त्याठिकाणी केंद्राच्या बांधकामासाठी एकत्रितपणे देणगी दिली आहे.
मुंबईतील ६१ वर्षांच्या दीपिका मुंडले यांनी त्यांची वडिलोपार्जित ३० हजार चौरस फुटाची जागा टाटा रुग्णालयाला देणगी म्हणून दिली आहे. सध्याच्या टाटा रुग्णालयापासून ही जागा फक्त ४०० मीटर अंतरावर आहे. नवे केमोथेरपी केंद्र झाल्यानंतर सध्या असलेल्या व्यवस्थेवरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. सध्या रुग्णालयात केमोथेरपीसाठी १०० बेड असून रोज ५०० रुग्णांना केमोथेरपी दिली जाते, असे असले तरी आजही रुग्णांना केमोथेरपीसाठी ३० दिवसांची वाट पहावी लागते. त्याचबरोबर पश्चिम आशियातील देशांतून तसेच अफ्रिका खंडातील अनेक देशांमधील रुग्णांनाही याठिकाणी उपचार हवे असतात. रुग्णालयातील व-हांडे कायम रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी गजबजलेले असतात. कुणी अॅडमिट होण्याची वाट पहात असतात तर अनेकजण पाठपुराव्याच्या उपचारासाठी आलेले असतात, इथला केमोथेरपी उपचार विभाग कायम व्यस्त असतो. याठिकाणी वर्षाला सुमारे ७५ हजार नव्या रुग्णांवर उपचार केले जातात. तर वर्षभरात साडेचार लाख रुग्ण नंतरच्या उपचारांसाठी येऊन जातात.
नव्या केंद्रात २०० रुग्णांवर केमोथेरपी शक्य
नव्या केंद्रात केमोथेरपीसाठी ५६ बेड असतील आणि रोज याठिकाणी २०० रुग्णांवर केमोथेरपीचे उपचार करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर याठिकाणी होणाऱ्या इमारतीत समुपदेशन दालने, केमोथेरपीनंतर लागणाऱ्या रिकव्हरी रुम्स आणि कौशल्य विकास प्रयोगशाळा असणार आहेत. या प्रयोगशाळेतून डॉक्टरांना कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांचे प्रशिक्षण मिळणार आहे. दोन मजले डॉक्टरांच्या निवासस्थानांसाठी राखून ठेवण्यात येणार आहेत.