मुंबईत उभे राहणार १२० वर्षे जगणाऱ्या ताडाच्या झाडांचे जंगल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 08:45 AM2021-08-21T08:45:56+5:302021-08-21T08:46:15+5:30
Mumbai : जंगलात लागणाऱ्या आगींना रोखण्यासाठीचे काम ताडाच्या झाडाकडून होते. त्यामुळे आरेत आता ताडाचे जंगल उभे करण्यात येणार आहे.
मुंबई : पर्यावरण संवर्धनासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत आरेच्या जंगलात १ हजार ४०० हून अधिक ताडाच्या झाडांच्या बिया रोवण्यात आल्या आहेत. जंगलात लागणाऱ्या आगींना रोखण्यासाठीचे काम ताडाच्या झाडाकडून होते. त्यामुळे आरेत आता ताडाचे जंगल उभे करण्यात येणार आहे.
मुंबईकरांनी सहभाग नोंदविलेल्या या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात दादर येथील चौपाटीवरदेखील ताडाची झाडे लावण्यात येणार आहेत. आरेमधील मोहिमेत पंचवीसहून अधिक मुंबईकर सहभागी झाले आहेत. विरार, दहिसर आणि सायन येथील नागरिक यात सहभागी होत आहेत.
जंगलांना जेव्हा आगी लागतात, तेव्हा जंगल जळून खाक होते. मात्र, अशा आगीत ताडाचे झाड लवकर जळत नाही. आरेमध्येदेखील आगी लागत आहेत. येथील आगी म्हणजे अपघात नाहीत, तर येथे आगी लावल्या जातात. मात्र, ताडाची झाडे लावल्याने आग रोखण्यात यश येते. त्यामुळे जिथे जिथे आग लागते, तिथे ही झाडे लावण्यात येत आहेत. शिवाय जिथे स्वदेशी झाडे नाहीत, तिथेदेखील ताडाची झाडे लावली जात आहेत.
कारण आरेमध्ये अनेक झाडे स्वदेशी किंवा मूळची झाडे नाहीत. म्हणून मूळ, स्थानिक झाड म्हणून आम्ही ताडाच्या झाडावर भर देत आहोत. शिवाय वड, पिंपळ, उंबर, जांभूळ अशी झाडे लावण्यावरदेखील भर देत आहोत, अशी अधिक माहिती सेव्ह आरे मूव्हमेंट पेड लगाओ पेड बचाओ प्रोजेक्टचे ऑर्गनायजर संजीव वल्सन यांनी दिली. संजीव वल्सन यांनी मोहिमेबाबत सांगितले की, याकामी आम्हास सॅम्यूल ऑफ सेंट पॉल मेथॉडिस्ट तामिळ चर्चचे फादर गॉडसन यांनी मोलाची मदत केली आहे.
ताडाच्या झाडापासून फळ मिळते. गूळ मिळतो. छतासाठी याचा वापर केला जातो. मात्र, आता ताडाची झाडे राहिली नसल्याने अनेक तोटे होत आहेत. शिवाय अनेक पक्ष्यांचे आश्रयस्थान ताडाचे झाड आहे. ताडाच्या झाडाची मुळे खोलवर जातात. पाणी खेचून घेतात. यामुळे अगदी जमिनीत खोलवर असलेले पाणी वर येण्यास मदत होते. जमिनीतील पाणी वर आल्याने ओसाड जमिनीदेखील सुजलाम्, सुफलाम् होऊ शकते.
ठिकठिकाणी होणार लागवड
ताडाच्या झाडाचे एक पान उगविण्यासाठी एक ते दीड वर्ष लागते. पहिले फळ मिळण्यासाठी किमान बारा वर्षे जातात. मात्र, एकदा का हे झाड वाढले, तर ते १२० वर्षे माणसाला जगविते. आरेमध्ये दोन दिवसांत ताडाच्या झाडाच्या बिया टोकणण्यात आल्या. काही दिवस हा उपक्रम सुरू राहिला. त्यानंतर हा आकडा चौदाशेपर्यंत पोहोचला. ही मोहीम कठीण आहे. कारण या बिया जमविण्यासाठी मोठे कष्ट करावे लागतात. बिया गोळा करण्यासाठी किमान चार ते पाच आठवडे लागले. आरेमधूनच या बिया गोळा करण्यात आल्या. केवळ आरेमध्ये नाही तर जेथे जेथे ताडाची झाडे कमी होत आहेत, तिथे तिथे ही झाडे या मोहिमेंतर्गत लावण्यात येत आहेत.