मुंबई : पोलिसांच्या गृहकर्जासाठी आॅनलाइन अर्ज नोंदणी सुरू करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात सॉफ्टवेअर प्रतिसाद देत नसल्याने त्याचा घोळ सुरू आहे. आजच्या घडीला राज्यात १,२०० अर्जांची नोंदणी प्रलंबित आहे.पोलिसांना घरबांधणी, वाहनांसाठी कर्ज दिले जाते. घटकप्रमुख, महानिरीक्षकांमार्फत हे अर्ज आतापर्यंत पोलीस गृहनिर्माणच्या महासंचालकांकडे पाठविले जात होते, परंतु आता त्याची आॅनलाइन नोंदणी होत आहे. त्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करून, संबंधितांना प्रशिक्षणही दिले. जिल्हास्तरावरून राज्यात सर्वत्र नोंदणी सुरू असल्याने सॉफ्टवेअरचा प्रतिसाद आणि पर्यायाने गृहकर्जाच्या अर्जाची नोंदणी थांबली आहे. आॅनलाइन नोंदणीचा हा घोळ सुरू आहे. जिल्हास्तरावर या आॅनलाइन नोंदणीत तांत्रिक सहकार्य मिळत नसल्याचे सांगितले जाते. महासंचालक कार्यालयाकडून या तांत्रिक दोषाबाबत समाधानकारक उत्तर मिळत नाही. पूर्वी लेखी अर्ज जात असल्याने ज्येष्ठता यादी तयार होत होती. आपल्याला गृहकर्ज मिळण्यास आणखी किती वेळ लागणार, याचा अंदाज येत होता, परंतु आॅनलाइनमुळे राज्यभरातील पोलिसांना काहीच कळेनासे झाले आहे. महासंचालकांनी पोलिसांच्या सोयीसाठी ही आॅनलाइन नोंदणी सुरू केली असली, तरी तांत्रिक बिघाडामुळे मूळ उद्देशाला नख लागत आहे. आॅनलाइन नोंदणीचा प्रयत्न करणाऱ्या बहुतांश पोलिसांना ‘रेकॉर्ड नॉट फाउंड’ एवढाच संदेश येतो आहे.
पोलिसांच्या गृहकर्जाचे १,२०० अर्ज प्रलंबित, आॅनलाइन नोंदणीचा घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 1:00 AM