एसटीच्या ताफ्यात येणार १२०० बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:10 AM2021-09-16T04:10:43+5:302021-09-16T04:10:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच १,२०० बस दाखल होणार आहेत. स्वमालकीच्या ७०० आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच १,२०० बस दाखल होणार आहेत. स्वमालकीच्या ७०० आणि भाडेतत्त्वावरील ५०० बसचा समावेश असणार आहे. स्वमालकीच्या गाड्यांच्या बांधणीसाठी लागणाऱ्या सांगाड्यांची निविदा प्रक्रिया राबविली जात असल्याची माहिती एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या १६,५०० गाड्या असून, यामध्ये साध्या बस, निमआराम, स्वमालकीच्या व भाडेतत्त्वावरील शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध गाड्या आहेत. दरवर्षी महामंडळाच्या ताफ्यातून हजारो बसची कालमर्यादा संपल्याने त्या भंगारात काढल्या जातात; परंतु निधीचा अभाव आणि कोरोना संकटामुळे ताफ्यात नवीन बस दाखल करता आल्या नाहीत. आता नवीन साध्या प्रकारातील बस घेण्याचा निर्णय झाला असून, यात ७०० स्वमालकीच्या आणि ५०० भाडेतत्त्वावरील बस असणार आहेत.
सात ते आठ महिन्यांचा कालावधी
महामंडळाच्या राज्यातील सात विभागांकरिता घेण्यात येणाऱ्या या बस आठ वर्षांकरिता भाडेतत्त्वावर असतील. त्यावर चालक खासगी कंत्राटदाराचा व वाहक एसटीचा असेल. यासाठी निविदा प्रक्रियाही राबविली जात आहे, तर स्वमालकीच्या बससाठी चेसिस खरेदीकरिता निविदा मागवण्यात आल्याचे सांगण्यात आले. साधारण ही सर्व प्रक्रिया राबवून या नव्या बस ताफ्यात येण्यासाठी सात ते आठ महिने लागतील, अशी माहिती देण्यात आली.