मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीची तारिख लवकरच जाहीर होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यास महापालिकेची सर्व विकास कामे ठप्प होणार आहेत. तत्पूर्वी नागरी व पायाभूत सुविधांच्या प्रकाल्पांना स्थायी समितीच्या बैठकीत कोणत्याही चर्चेविना तात्काळ मंजुरी देण्यात येत आहे. या प्रकल्पांना मंजुरी मिळाल्यामुळे त्या कामांचे कायार्देश काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन आठवड्यात तब्बल १२०० कोटींची विकास कामे मंजूर झाली आहेत.शिवसेना-भाजपात युती झाल्यामुळे पहारेकरी आता भागिदाराच्या भूमिकेत आहेत. परिणामी शिवसेनेच्या मार्गातील मोठा अडसर दूर झाला आहे. गेल्या महिन्याभरात विविध प्रस्तावांना झटपट मंजुरी मिळू लागली आहे. गेल्या आठवड्यात सुमारे ७०० कोटी रुपयांचे तब्बल ८० प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर प्रशासनाने मांडले होते. यापैकी दहा प्रस्ताव वगळता इतर सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी तातडीने बैठक बोलावून तब्बल पाचशे कोटींहून अधिक रक्कमेच्या ६९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.या प्रस्तावांमध्ये रस्त्यांचे काँक्रिटीकरण, नाल्याचे बांधकाम, उड्डाणपुलांच्या खाली सुशोभीकरण, पाण्याची गळती रोखणे, शाळांची दुरुस्ती, कस्तुरबा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, जलवाहिन्यांची कामे, रुग्णालय परिसरात वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम या प्रस्तावांचा समावेश होता.आधीच्या बैठकीतील आणि नवीन असे ८० प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने आज मांडले. यापैकी ६९ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. अवघ्या काही तासांमध्ये चर्चेविनाच हे प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आचारसंहितेच्या धास्तीने १२०० कोटींची विकासकामे मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 1:38 AM