मुंबई - भाजपा नेते किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपाचं रान उठवलं आहे. सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. उद्धव ठाकरे यांनी संपत्ती आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती लपवली असल्याचा आरोप करत त्यांनी ही तक्रार दाखल केली होती. आता, पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांविरोधात किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन भ्रष्ट्राचाराचे गंभीर आरोप केले आहेत. तसेच, इक्बाल चहल यांची हकालपट्टी करा, अशी मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितलं.
मुंबईत 5 हजार खाटांचं 12 हजार कोटींचं हॉस्पीटल उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यासाठी, मुलूंड येथील जागा घेऊन 2100 कोटी रुपये देण्याचा निर्णयही झाला होता. महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी हा अहवालही पाठवला. त्यामध्ये, मुख्यमंत्र्यांच्या इच्छेनुसार हा अहवाल पाठवल्याचं चहल यांनी म्हटल्याचे सोमय्यांनी वाचून दाखवले. मात्र, भाजपाने हा विषय जनतेत नेला, राज्यपालांची भेटही घेतली. त्यानंतर, राज्यपालांनी या घोटाळ्याच्या तपासाचे आदेश दिले. त्यामुळे, बिल्डरला 2100 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मागे घ्यावा लागला, असे किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
किरीट सोमय्या यांनी याप्रकरणाची चिरफाड केल्यानंतर, 11 जानेवारी 2021 रोजी आयुक्त इक्बाल चहल यांनी राज्य सरकारला पत्र पाठवलं. त्यामध्ये, महापालिकेकडून हॉस्पीटलसाठी कोणत्याही जमिनीची निश्चिती करण्यात आली नसल्याचं म्हटलं आहे. मग, मुख्यमंत्री की महापालिका आयुक्त जनतेला मुर्ख बनवत आहेत?, असा प्रश्नही किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. तसेच, याप्रकरणी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह यांनी कोश्यारी यांची भेट घेऊन इक्बाल चहल यांच्या हकालपट्टीची मागणी करणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. यावेळी, किरीट सोमय्या यांनी कागदपत्रे दाखवत मुख्यमंत्र्यांना सवाल केले आहेत.
यापूर्वीही केले होते आरोप
"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्नीच्या नावे अलिबाग मध्ये असलेली ५ कोटी रूपयांची संपत्ती माहित असूनही ती निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दाखवली नाही. मी स्वत: या प्रकरणाचा जाऊन तपास केला. महाराष्ट्रातील भारत निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी बलदेवसिंग यांच्याकडे भाजपानं तक्रार दाखल केली आहे. उद्धव ठाकरे यांनी जाणूनबुजून आपली ही संपत्ती लपवली आहे आणि त्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही केली आहे," असं सोमय्या म्हणाले. तसंच बलदेवसिंग यांनी आम्हाला आमची तक्रार दिल्लीत निवडणूक आयोगाला पाठवणार असल्याचं आश्वासन दिल्याचंही त्यांनी नमूद केलं.