मुंबई : मुंबईतील मिठी, ओशिवरा, पोईसर आणि दहिसर नद्यांच्या संवर्धनासाठी रिव्हर मार्चने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत रविवारी पोईसर नदीतून तब्बल १२ हजार किलो प्लॅस्टिक कचरा काढण्यात आला. कोणत्याही यंत्राचा वापर न करता, रिव्हर मार्चच्या वतीने ही कामगिरी पार पाडण्यात आली.रिव्हर मार्चला महानगरपालिकेकडून जेसीबी आणि ट्रकची कचरा काढण्यासाठी व नेण्यासाठी वेळोवेळी मदत मिळते. मात्र, रविवारी काही कारणास्तव महानगरपालिकेकडून मदत मिळाली नाही. परिणामी, रिव्हर मार्चच्या सभासदांनी स्वत:हून पुढाकार घेत काम सुरू केले. त्यामुळे कोणत्याही मदतीशिवाय नदी पात्रातील प्लॅस्टिक कचरा वेचण्यात आला. हा कचरा नदीच्या काठावर ठेवण्यात आला आहे.दरम्यान, नदीकाठी असणाऱ्या स्थानिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २३ एप्रिल रोजी पार पडणार आहे. आरोग्य शिबिरासह स्थानिकांना प्रदूषित नदीचे परिणाम सांगून, जनजागृतीदेखील करण्यात येणार आहे. आरोग्य शिबिर आणि जनजागृती कार्यक्रमासाठी पी उत्तर वॉर्ड अधिकाऱ्यांची परवानगी घेतलेली असल्याचे रिव्हर मार्चच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
पोईसर नदीतून काढला १२ हजार किलो प्लॅस्टिक कचरा
By admin | Published: April 17, 2017 4:03 AM