धक्कादायक! १२ हजार रुपये, एका मेंढराच्या बोलीवर दोन मुली ठेवल्या चक्क गहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 01:18 PM2022-09-21T13:18:52+5:302022-09-21T13:20:57+5:30
आदिवासींची गरिबी व अज्ञानाची अशीही चेष्टा, दोन आदिवासी मुलांची वेठबिगारीतून मुक्तता
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : देशातील सामान्य आदिवासींच्या नशिबातील भाकरीचा चंद्र शोधण्याचा संघर्ष मात्र कायम आहे. प्रसंगी पोटच्या गोळ्यांना कामाला जुंपले जाणे काळजावर दगड ठेवून सोसावे लागते. जव्हारच्या घटनेने समाजाची मान शरमेने खाली जाईल. दोन धनदांडग्यांनी मेंढ्या चारण्यासाठी १२ हजार रुपये व एका मेंढरूच्या बोलीवर दोन आदिवासी अल्पवयीन मुलींना गहाण ठेवून घेतले. त्यातील एका मुलीला त्यांनी अचानक जव्हारला परस्पर आणून सोडले, तर दुसरी मुलगी बेपत्ता आहे.
आदिवासी मजुरांच्या अज्ञानाचा आणि गरिबीचा फायदा घेणाऱ्या या धनदांडग्यांविरुद्ध जव्हार पोलीस ठाण्यात वेठबिगार उच्चाटन आणि बालमजूर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी जव्हार, मोखाड्यातील आदिवासी स्थलांतर करतात. जव्हार तालुक्यातील धारनहट्टी येथील नरेश भोये (२८) हा अहमदनगर जिल्ह्यातील तळेगाव येथे खडी फोडण्यासाठी देवराम कांदडकर व पुंडलिक कांदडकर यांच्याकडे गेले. २०१९ मध्ये मोठी मुलगी मनीषा (८) हीस १२ हजार आणि एक मेंढरू देण्याच्या बोलीवर मेंढरे चारणे, लेंड्या काढणे, साफसफाईसाठी मागितले. नरेशने त्याला सहमती दिली. त्यानंतर त्याची लहान मुलगी काळी (६) हिलादेखील २८ मार्च २०२१ ला हाच मोबदला देऊन कामावर नेले.
मोठीला आणून सोडले अन्...
नरेशचे कुटुंब जव्हारला घरी परतले; परंतु या दोन्ही मुली कांदडकरकडे कामासाठी तेथेच होत्या. १७ सप्टेंबरला कांदडकरांनी मोठी मुलगी मनीषाला अचानक जव्हारच्या प्रवेशद्वारावर असलेल्या शिरपामाळ येथे आणून सोडले आणि तेथून पोबारा केला. मनीषा तेथून पायपीट करत घरी पोहोचली. यावेळी नरेशने लहान मुलगी काळीविषयी चौकशी केली असता, ती मला तीन दिवसांपासून भेटली नसून ती कुठेतरी अन्यत्र काम करत असल्याचे मनीषाने सांगितले. त्यामुळे नरेशच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने तातडीने श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्या सीता घाटाळ यांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यांनी जव्हार पोलीस ठाणे गाठले.
दोन आदिवासी मुलांची वेठबिगारीतून मुक्तता
नितीन पंडित
भिवंडी : इगतपुरी तालुक्यातील गौरी आगविले या मुलीच्या संशयास्पद मृत्यूनंतर नाशिक - अहमदनगर भागात मेंढ्या राखण्यासाठी मेंढपाळांनी पालकांना कवडीमोल दाम देऊन लहान मुलांना नेल्याचे उघड झाले. श्रमजीवी संघटनेने पाठपुरावा करून दोन वेठबिगार बालकामगारांची सुटका केली असून, सोमवारी पडघा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राहुल दिलीप पवार (१७), अरुण रामू वाघे (१२) अशी वेठबिगारीतून मुक्त केलेल्या मुलांची नावे आहेत. पडघ्यानजीकच्या वडवली खोताचा पाडा येथील दिलीप पवार यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्यातील भिवा गोयकर याने येऊन आपल्याकडे मेंढ्या राखण्यासाठी कामगाराची गरज असल्याचे सांगितले. त्यांचा १७ वर्षांचा मुलगा राहुल याला आपल्यासोबत देण्याची मागणी केली. राहुलचे लग्न आपण लावून देऊ, असे सांगत कुटुंबियांना फक्त १,५०० रुपये देऊन सोबत घेऊन गेला. मागील दीड वर्षे त्याची पिळवणूक केली.