मुंबई - आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांची गळती रोखून त्यांच्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ मंत्रालयातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या एनएमएमएस (नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम) स्पर्धा परीक्षेत सायनच्या शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलने मुंबईत पहिला क्रमांक पटकावला आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी घेतल्या गेलेल्या एनएमएमएस स्पर्धा परीक्षेत डी. एस. हायस्कूल मराठी माध्यमाचे एकूण ७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी तब्बल ३१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. शिष्यवृत्ती अंतर्गत या ३१ विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षे म्हणजे इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि बारावीमध्ये दर वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहेत.अनुदानित शाळांतील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखाहून कमी असते, असे इयत्ता आठवीतील विद्यार्थी एनएमएमएस स्पर्धा परीक्षा देतात. यंदाची परीक्षा डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात आली होती. जून २०१८पासूनच इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी तयारी करून घेण्यात आली. शाळेच्या एनएमएमएस शिष्यवृत्ती विभाग प्रमुख पुष्पा लोहकरे व इतर सर्व साहाय्यक शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे विशेष वर्ग घेतले, तसेच त्यांच्याकडून स्पर्धा परीक्षेचा सराव करवून घेतला, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक अंकुश महाडिक यांनी दिली. शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होते, अशी माहिती मुख्याध्यापक महाडिक यांनी दिली.
शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार १२ हजार रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 4:53 AM