१२२ वर्षांचा पारंपरिक गणेशोत्सव; जगन्नाथ चाळ सार्वजनिक श्री गणेशोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 05:58 AM2017-09-03T05:58:20+5:302017-09-03T05:58:28+5:30
गणेशोत्सवाचे स्वरूप गेल्या काही वर्षांत सातत्याने बदलत आहे. मंडळांमध्ये गणेशमूर्ती, देखाव्यांवरून स्पर्धा रंगते, पण गिरगाव परिसरात अजूनही पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
मुंबई : गणेशोत्सवाचे स्वरूप गेल्या काही वर्षांत सातत्याने बदलत आहे. मंडळांमध्ये गणेशमूर्ती, देखाव्यांवरून स्पर्धा रंगते, पण गिरगाव परिसरात अजूनही पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. धर्मैक्य संरक्षक संस्था, जगन्नाथ चाळ सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, गेली १२२ वर्षे परंपरा जपत गणेशोत्सव साजरा करीत आहे.
धर्मैक्य संरक्षक संस्था,जगन्नाथ चाळ सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, गेल्या १२२ वर्षांपासून सातत्याने गणेशोत्सव साजरा करीत आहे. या मंडळामध्ये शाडूच्या मातीची गणेशमूर्ती आणली जाते. गणपतीच्या आगमन आणि विसर्जनाची मिरवणुक ही पालखीतून काढली जाते. पारंपरिक पद्धतीने दोन्ही मिरवणुका काढल्या जातात, डीजे अथवा अन्य गोंगाट कधीच नसतो. यंदा मंदिराची सजावट करण्यात आली आहे.
गणेशोत्सवात कार्यक्रमात म्हणून भजन अथवा कीर्तनाचे आयोजन करण्यात येते. सध्याच्या जीवनशैलीमुळे एकमेकांना निवांत भेटण्याचा वेळ अनेकांकडे नसतो. नोकरीच्या अनिश्चित वेळांमुळे एकत्र भेटता येत नाही. अशा परिस्थितीतही या मंडळातील सर्व मंडळी एक दिवस एकत्र भेटतात. एकत्र येण्यासाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या दिवशी वाडी सोडून गेलेले कुटुंबीयही मंडपात हजेरी लावतात.
मंडळातील मुलांवर विविध जबाबदाºया दिल्या जातात. सध्या मंडळात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांची ही तिसरी किंवा चौथी पिढी आहे. उत्सवात कोणत्याही प्रकाराचा अतिरेक केलेला नाही, असे मंडळाचे पदाधिकारी सदानंद खेडेकर यांनी सांगितले.