५० वर्षांपुढील पोलिसांसाठी नवा फॉर्म्युला; वाढत्या काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई पोलीस दलात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे ५० वर्षांपुढील अंमलदारांना १२ तास सेवा बजावल्यानंतर २४ तास आरामाचा फॉर्म्युला लागू करण्यात आला आहे. तसेच पोलीस ठाण्यापासून लांब राहणाऱ्या पोलीस अंमलदारांसाठी पोलीस ठाण्याजवळ राहण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांनी मंगळवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिल्या आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका पोलिसांना बसू नये, म्हणून हे आदेश काढण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्यावेळेस ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्वाधिक पोलिसांना कोरोनाचा फटका बसला होता. त्यामुळे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यासह गर्भवती महिला पाेलिसांनाही घरी राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, यावर्षी अपुऱ्या मनुष्यबळामुळे ५० वर्षांपुढील तसेच गर्भवती महिला पोलिसांनाही कर्तव्यावर बोलाविण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी त्यांच्यावर बंदोबस्ताचे ओझे न देता पोलीस ठाण्यातील कामकाज हाताळण्याची जबाबदारी साेपवली आहे. तसेच त्यांनाही १२ तास सेवा केल्यानंतर २४ तास आरामाची मुभा देण्यात आली आहे. त्यांना आठवड्यातून दोन दिवस सुट्टीची मुभाही देण्यात आली आहे.
लांबून येणाऱ्यांची पोलीस ठाण्याजवळ राहण्याची व्यवस्था!
पोलीस ठाण्यापासून किमान एक तास प्रवासाच्या अंतरावर राहणाऱ्या इच्छुक पोलिसांची पाेलीस ठाण्याजवळच राहण्याची व्यवस्था करावी. अशा पोलीस अंमलदारांना १२ तास कर्तव्य देऊन त्यांची आरामाची व्यवस्था करावी तसेच त्यांना आठवड्यात दोन दिवस सुट्टी द्यावी, जेणेकरून ते आपल्या कुटुंबाला भेटू शकतील. या कर्तव्य वाटपाबाबत वेळोवेळी तपासणी करावी, असे आदेशही विश्वास नांगरे-पाटील यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले.
..............................