पोलीस दलात आता १२/२४ तासांचा फॉर्म्युला; मुंबई पोलीस आयुक्तांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 05:49 AM2020-04-29T05:49:53+5:302020-04-29T05:50:41+5:30
पहिल्या टप्प्यात ५५ वर्षीय पोलिसांसह मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या ५२ वर्षीय पोलिसांना घरी राहण्याच्या सूचना मंगळवारी दिल्या.
मुंबई : कोरोनाने मुंबई पोलीस दलातील ३ बळी घेतल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात ५५ वर्षीय पोलिसांसह मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या ५२ वर्षीय पोलिसांना घरी राहण्याच्या सूचना मंगळवारी दिल्या. सोबतच मुंबईत १२ तास सेवा बजावल्यानंतर २४ तास आरामाचा फॉर्म्युलाही ३ मेपर्यंत लागू केला.
पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. कोरोनामुळे तीन दिवसांत वयाची पन्नाशी उलटलेल्या ३ पोलिसांना जीव गमवावा लागला. तर, मुंबईत ४० हून अधिक कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. त्यातच कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबईत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना उपचारासाठी वणवण करावी लागत असल्याने पोलिसांत संतापाचे वातावरण आहे.
महिन्याभरापूर्वी पोलीस आयुक्तांनी ५५ वर्षीय पोलिसांना घरी थांबण्याच्या तोंडी सूचना दिल्या होत्या. हेच आदेश लेखी दिले असते तर बरे झाले असते, असा सूर काही पोलिसांत आहे. पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी मंगळवारी याबाबत लेखी निर्देश जारी केले. त्यामुळे ५५ वर्षीय पोलिसांसह मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या ५२ वर्षीय पोलिसांनाही दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी ‘लोकमत’ने पोलिसांच्या व्यथा मांडताना या फॉर्म्युल्याबाबत मागणी वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. दरम्यान, पोलिसांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एचसीक्यूच्या गोळ्या देण्यात येत असून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी २० हजार पोलिसांना मल्टीव्हिटॅमिन आणि प्रोटीनयुक्त आहार पुरविला जात आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबाला पन्नास लाखांची मदत देण्यात येत असल्याचे प्रणय अशोक यांनी सांगितले.